पोलीसाच्या पत्नीची दोन चिमुरड्यासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 02:52 PM2021-05-15T14:52:23+5:302021-05-15T14:56:25+5:30
Crimenews Sangli : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली. उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
विटा (सांगली) : राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीसाच्या पत्नीने तिच्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंगरे (ता.खानापूर, जि. सांगली) येथे घडली. उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), कु. रिया जोतीराम शिंदे (वय ६) व चि. केदारनाथ जोतीराम शिंदे (वय १, सर्व रा. लेंगरे, पाटीलवस्ती) अशी जीवनयात्रा संपविलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
लेंगरे येथील जोतीराम शिंदे हे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब लेंगरे येथील भूड रस्त्यावरील पाटीलवस्ती येथे वास्तव्यास आहे. शिंदे यांचा गेल्या सात ते आठ वर्षापूर्वी कलेढोण येथील उजिता यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या वर्षभरापासून विवाहिता या प्रसुतीसाठी माहेरी कलढोण येथे गेल्या होत्या.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या सहा वर्षाची मुलगी रिया, एक वर्षाचा मुलगा केदारनाथ यांच्यासह सासरी लेंगरे येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती जोतीराम हे सुध्दा दि. १ मे रोजी सुट्टी घेऊन गावी लेंगरे येथे आले होते. त्यामुळे घरी विवाहिता उजिता, मुलगी रिया, मुलगा केदारनाथ, पती व सासू-सासरे असे वास्तव्यास होते.
शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक विवाहिता उजिता या दोन लहान मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी लेंगरे येथील पाटीलवस्तीवरील दुर्योधन शिंदे यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत मुलगी रिया, चिमुरडा केदारनाथ या दोघांसह स्वत: विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आली नसल्याने पतीसह तेथील स्थानिक लोकांनी विहीरीत शोध घेतला असता उजिता यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
रात्री काळोख असल्याने रिया व केदारनाथ या चिमुरड्यांच्या शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे शनिवारी सकाळी आठ वाजता विटा पोलीसांच्या मदतीने दोन मुलांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अकुंश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, बीट हवालदार अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची वर्दी पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांनी विटा पोलीसांत दिली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आपल्या दोन चिमुरड्या मुलांसह विवाहिता उजिता शिंदे यांनी केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेला कौटुंबिक वादाची झालर असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. विटा ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर या माय-लेकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.