पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:28 AM2021-04-24T04:28:06+5:302021-04-24T04:28:06+5:30
सांगली : कोरोनाचा कहर वाढत असतानाच, नागरिकांना संसर्ग होऊ नये यासाठी खाकी वर्दी पुन्हा एकदा सरसावली आहे. प्रत्येक चौकात ...
सांगली : कोरोनाचा कहर वाढत असतानाच, नागरिकांना संसर्ग होऊ नये यासाठी खाकी वर्दी पुन्हा एकदा सरसावली आहे. प्रत्येक चौकात तपासणीसाठी पोलीस असताना, त्यांच्या आरोग्याचीही काळजी महत्त्वाची ठरली आहे. जिल्हा पोलीस दलातील कोरोनाचा शिरकाव नियंत्रणात असला तरी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना आघाडी घेऊन कराव्या लागणाऱ्या बंदोबस्तामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र चिंतेत आहेत.
जिल्ह्यात विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असताना, पोलीस दलातील २३ जण बाधित आहेत. इतर जिल्ह्यांत पोलिसांचे बाधित होण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र, ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची ड्युटी न देणे यासह नियमित आरोग्य तपासणीसाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी प्राधान्य दिले आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून संख्या कमी असली तरी वाढत्या संसर्गापासून रोखण्यासाठी व सततच्या संपर्कामुळे घरातील प्रत्येक सदस्याला बंदोबस्तावर असलेल्या आपल्या वडिलांची, पतीची, मुलाची काळजी लागून राहिलेली असते.
जिल्ह्यात कोविड रुग्णालयासह कंटेन्मेंट झोन परिसरात, होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या हालचाली जाणून घेण्यासाठी पोलिसांना नियमितपणे जोखीम पत्करून सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळेच संसर्ग कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी आता आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेण्यास प्राधान्य देणे आवश्यक बनले आहे.
चौकट
लसीकरण
पहिला डोस घेणारे पोलीस कर्मचारी २२०७
पहिला डोस घेतलेले पोलीस अधिकारी १३७
एकही डोस न घेतलेले कर्मचारी ५१३
आजवरचे एकूण पॉझिटिव्ह ३८४
चौकट
एकूण कोरोनाबाधित पोलीस ३५३
उपचार घेत असलेले २१
एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी ३४
सध्या उपचार घेत असलेले पोलीस अधिकारी २
मृत्यू ६
कोट
बाबा आम्ही घरी वाट पाहतोय...!
कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून बाबांची चिंता वाटत आहे. मात्र, सुरक्षितपणे ते सेवा बजावत आहेत. उलट अशा कठीण परिस्थितीतही ते बंदोबस्तावर आहेत. घरातील प्रत्येक सदस्य नियमित त्यांच्या संपर्कात असतो. तरीही त्यांचे या कालावधीतील काम बघून अभिमानच जास्त वाटतो.
- ओंकार सर्जेराव गायकवाड
कोट
कोरोनाची पहिली लाट आल्यापासूनच वडिलांबद्दल काळजी वाटते. मात्र, तरीही त्यांची सेवा अत्यावश्यक असल्याने त्यांना जावे लागते. ते ड्युटीवर असताना नेहमी संपर्कात राहून काळजी घेण्याविषयी सांगत असतो.
निरंजन सदामते
कोट
गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. तरीही बाबा नियमितपणे कर्तव्यावर रूजू आहेत. घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची चिंता ही असतेच. त्यांच्या आरोग्याचीही आम्ही काळजी घेत आहोत.
ऋषीकेश जाधव
कोट
काेणतीही भीती न बाळगता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वडील करत असलेल्या कामाचाच जास्त अभिमान वाटतो. काळजी असली तरी त्यांच्यामुळे जनतेची काळजी दूर होते, हे खूप महत्त्वाचे आहे.
यश नागणे