बामणोलीत भरदिवसा पोलिसाचा बंगला फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:51 PM2020-01-24T15:51:13+5:302020-01-24T15:52:40+5:30
बामणोली (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या मनोहर रामजी बामणे (वय ५०) यांचा बंद बंगला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन हजार पाचशे रुपये रोख, असा २ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या मनोहर रामजी बामणे (वय ५०) यांचा बंद बंगला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन हजार पाचशे रुपये रोख, असा २ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
बामणोलीतील मनोहर बामणे यांचा मुलगा गणेश हा सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस असून त्याची पत्नी नाशिक येथे पोलीस सेवेत कार्यरत आहे. बामणे कुटुंबीय गुरुवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दोन बेडरूममधील लाकडी कपाटे फोडून सोन्याचे दोन गंठण, चेन, दोन अंगठ्या, कर्णफुले, दोन मंगळसूत्रे असे अकरा तोळे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे दागिने व रोख दोन हजार पाचशे रुपये असा एकूण अंदाजे दोन लाख वीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस पथकाने कसून तपास केला. परंतु श्वानपथक परिसरातच घुटमळल्याने चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.
दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.