इस्लामपुरात वैयक्तिक वादाला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 11:19 PM2016-04-26T23:19:04+5:302016-04-27T00:46:19+5:30

पोलिस अधिकाऱ्यांपुढे आव्हान : दलित संघटना आक्रमक; शिवसेनेचे आनंदराव पवार बिनधास्त

Political colors in personal conflict in Islampur | इस्लामपुरात वैयक्तिक वादाला राजकीय रंग

इस्लामपुरात वैयक्तिक वादाला राजकीय रंग

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील महात्मा फुले कॉलनीत शंकर महापुरे यांच्या मालकीचे दोन गाळे आहेत.
या गाळ्यांच्या कब्जावरून शंकर महापुरे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश पाटोळे यांच्यात वाद आहे. राजकीय द्वेशापोटी शंकर महापुरे यांनी माझ्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केला आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्यामुळेच मी खुलेआम शहरात फिरू शकतो, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. या वैयक्तिक प्रकरणाला आता राजकीय रंग आला आहे. त्यामुळेच तपास अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शंकर ज्ञानू महापुरे यांनी पोलिसांत आनंदराव पवार यांच्याविरोधात जातीवाचक गुन्हा दाखल केला आहे. महापुरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, इस्लामपूर नगरपालिका हद्दीत शाहूनगर परिसरातील हरिजन को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील सिटी सर्व्हे क्र. ३३६८- एफमध्ये स्वत:ची घरमिळकत आहे. तेथेच दोन गाळे आहेत. इस्लामपूर येथे राहणारे आनंदराव रामचंद्र पवार, त्यांचा भाऊ उमेश रामचंद्र पवार, सुहास संजय पाटील या तिघांनी मिळून मला गाळा मालकीसाठी शिवीगाळ करून धमकावले आहे. या तक्रारीवरुनच आनंदराव पवार यांच्यावर जातीवाचक गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरुनच शिवसेनेने शहर बंदची हाक दिली होती. त्याच कालावधित गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर, विजय शिवतारे यांनी, आनंदराव पवार यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पाहू. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांच्याकडे देण्यात आला. परंतु वैशाली शिंदे यांनी तात्काळ आनंदराव पवार यांच्यावर कारवाई न केल्याने दलित संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात स्वत: दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी लक्ष घातले असून, पवार यांना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.याउलट शिवसेनेच्या नेत्यांनी थेट पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र यांना अर्ज देऊन वैशाली शिंदे यांच्या तपासाबाबत आक्षेप नोंदवला. त्यामुळे शिंदे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो गडहिंग्लजचे पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांच्याकडे तपास गेल्यापासून आनंदराव पवार शहरातून खुलेआमपणे फिरु लागले आहेत. त्यामुळे दलित संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

तपास अधिकारी का बदलला : सकटे
शहरातील दलित समाजातील शंकर महापुरे यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास कलम ४ खाली विशेष पोलिस महानिरीक्षकांना सहआरोपी करुन १ मेपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी दिला. महापुरे यांच्या धरणे आंदोलनस्थळी भेट देऊन सकटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नव्याने अंमलबजावणी करताना, गुन्हा दाखल झाल्यापासून ३0 दिवसात आरोपींना अटक करण्याची तरतूद आहे. मात्र आय. जी. वर्मा हे दलितांना न्याय मिळवून देण्यात अडथळा आणत आहेत. तपास अधिकारी बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मग आय. जीं.नी तपास अधिकारी कसा बदलला? पोलिसांकडून आरोपींना साक्षीदार फोडण्यासाठी वेळ दिला जात आहे का? असाही प्रश्न सकटे यांनी उपस्थित केला.

Web Title: Political colors in personal conflict in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.