जयंतरावांशीच राजकीय शत्रुत्व
By admin | Published: March 20, 2016 10:37 PM2016-03-20T22:37:57+5:302016-03-20T23:40:20+5:30
अभिजित पाटील : बहुतांश कॉँग्रेस नेते प्रस्थापितांच्या दावणीला
अशोक पाटील - इस्लामपूर
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात राजकीय खेळ्या आणि तडजोडी करून गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ आपल्या हातात सत्ता अबाधित ठेवणाऱ्या आमदार जयंत पाटील यांना पारंपरिक राजकीय शत्रू मानूनच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे अभिजित पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी कोल्हापूरसारख्या शहरात शिवसेनेला चांगले दिवस येऊ शकतात, तर वाळवा-शिराळ्यात का नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
अभिजित पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार केला. तेव्हापासून आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो, असा अर्थ काढला जात होता. परंतु मी काँग्रेसमध्येच कार्यरत होतो. मागील काळात काँग्रेसच्या नेत्यांनीही मला कोणत्या पक्षात आहे, असे विचारण्याचे धाडस केले नाही किंवा पक्षातून काढलेही नाही. परंतु जयंत पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी काँग्रेसला देऊन राष्ट्रवादीची म्हणजेच स्वत:ची अब्रू वाचवली. त्यामुळे मी थेट राजू शेट्टींच्या प्रचाराच्या कामाला लागलो. याचा अर्थ मी स्वाभिमानी पक्षात गेलो, असा होत नाही.
काँग्रेस पक्षात स्वातंत्र्य नाही. वाळवा-शिराळ्यात काँग्रेसला खमके नेतृत्व नाही. बहुतांशी काँग्रेसचे नेते हे जयंत पाटील यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळेच या दोन्ही तालुक्यात जयंत पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. ज्या पक्षात स्वातंत्र्य आहे, असा पक्ष म्हणजे शिवसेना आहे. म्हणूनच गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या.
परंतु याची कसलीही कल्पना कोणालाही लागू दिली नव्हती. ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी सर्वजण अवाक् झाले.
माझे मुख्य उद्दिष्ट विधानसभा निवडणूक असून, आगामी निवडणुकीत माझे जयंत पाटील यांना आव्हान राहील. कोल्हापूर शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद असतानाही जनतेने शिवसेनेला डोक्यावर घेतले. वाळवा-शिराळ्यात असे का घडू शकणार नाही, असाही प्रश्न अभिजित पाटील यांनी उपस्थित केला.
पाटील हे वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांच्या उद्योग समूहातील संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे व कोरे यांचे संबंधही चांगले आहेत. कोरे यांचा जनसुराज्य पक्ष सक्रिय असताना तुम्ही शिवसेनेत का गेलात, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, वारणा उद्योग समूहात सर्वच पक्षाचे नेते सक्रिय आहेत. त्यामुळे येथे राजकारणाचा काहीही संबंध नाही.
‘ते’ सांगता येणार नाही...
राजकारणात जयंतरावांना शत्रू मानूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे अभिजित पाटील यांचे म्हणणे आहे. भविष्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार आणि पर्यायाने जयंत पाटील यांनीही शिवसेनेशी हातमिळवणी केली, तर जयंत पाटील तुमचे मित्र होणार का? असे विचारल्यावर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली.
इस्लामपुरातील विरोधकांची ताकद एकवटण्याचे मोठे आव्हान
इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांची मोठी ताकद आहे. योगायोगाने त्यांचे कार्यकर्तेही आर्थिक ताकदीसह राजकारणातही सक्षम आहेत. त्यामुळे विरोधकांची एकसंध असलेली ताकद एकवटण्यासाठी अभिजित पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
शिवसेनेचे आगामी उमेदवार
अभिजित पाटील यांचा चिकुर्डे जि. प. मतदार संघ हा शिराळा मतदारसंघात येतो. तरीही त्यांनी आपले राजकीय लक्ष कृष्णा खोऱ्यातील इस्लामपूर मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण शिवसेनेचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनीच संकेत दिले आहे.