सांगलीत कोणाच्या डोईवर विजयाचा गुलाल; राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष निकालाकडे
By अविनाश कोळी | Updated: June 3, 2024 20:05 IST2024-06-03T20:03:45+5:302024-06-03T20:05:13+5:30
लोकसभा निवडणुकीचा फैसला; हॅट्ट्रिक होणार की इतिहास बदलणार?

सांगलीत कोणाच्या डोईवर विजयाचा गुलाल; राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष निकालाकडे
सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीचा फैसला आज, ४ जूनला होत आहे. उमेदवार, पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली असून, जनतेमधून निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा भाजपचे उमेदवार संजय पाटील हॅट्ट्रिक करणार ? उद्धवसेना चमत्कार घडविणार ? की अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील इतिहास घडविणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज, मंगळवारी दुपारपर्यंत मिळणार आहेत.
सांगली जिल्ह्याची यंदाची लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली. उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष स्थानिक, तसेच राज्यपातळीवर झाला. अखेर महाविकास आघाडीत उद्धवसेनेला ही जागा गेली. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरविले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. भाजपविरुद्ध अपक्ष अशी चुरस यावेळी दिसून येत आहे. यात बाजी कोण मारणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. अपक्ष उमेदवाराला कधीही या मतदारसंघात यश मिळाले नसल्याने विशाल पाटील यंदा हा इतिहास नोंदविणार की संजय पाटील यांच्याकडून हॅट्ट्रिक नोंदली जाणार याचीही चर्चा रंगली आहे.