मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे :डॉ. अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:12 PM2019-07-19T14:12:45+5:302019-07-19T14:16:42+5:30
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा लाभ वंचित मतदारांनी घेऊन, मतदारयादीमध्ये आपले नाव नोंदवावे. त्यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगली : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा लाभ वंचित मतदारांनी घेऊन, मतदारयादीमध्ये आपले नाव नोंदवावे. त्यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित
राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह, शेखर इनामदार, ॲड. अजित सूर्यवंशी, आबासाहेब
जाधव, संदीप कांबळे, कुमार सावंत, संजय कुलकर्णी, यशवंत पाटील, दीपक माने आदि राजकीय पक्ष
प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 20,
21, 27 व 28 जुलै 2019 या सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी जिल्ह्यातील सर्व 2 हजार 474 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज
स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालये व 282 सांगली
विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे तसेच,
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे समाविष्ट होण्यासाठी नमुना - 6 चे अर्ज भरुन द्यावेत. प्रत्येक राजकीय पक्षाने मतदान केंद्र निहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ताची नियुक्ती करावी. त्यासाठीचे नमुना अर्ज मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय
पक्षांनी सतर्क राहावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 1 जानेवारी 2019 या अर्हता
दिनांकावर आधारित 15 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार सांगली जिल्ह्यातील 8
विधानसभा मतदारसंघात एकूण २३ लाख ६४ हजार ७०० मतदारांची संख्या आहे. यामध्ये १२ लाख १७
हजार ९५ पुरूष, ११ लाख ४७ हजार ५२९ स्त्री आणि ७६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये प्रत्येक मतदाराने आपले नाव असल्याची खात्री करावी. ज्यांची नावे मतदारयादीतून विविध कारणास्तव वगळण्यात आली आहेत, त्यांनी मतदार यादीत नावाचा समावेश होण्यासाठी अर्ज करावा. तसेच, अशी नाव वगळणी झालेल्या मतदारांची यादी बुथस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन ती तपासून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणारे सर्व नागरिक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करु शकतील.
ज्या मतदारांची मतदार यादीत छायाचित्रे नाहीत तसेच ज्यांची कृष्णधवल छायाचित्रे आहेत अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे या कालावधीत रंगीत छायाचित्र (फोटो) देऊन सहकार्य करावे. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे समाविष्ट होण्यासाठी नमुना - 6 चे अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अस्तित्वातील मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप
नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील
मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. एकाच मतदारसंघात एका
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास त्याकरिता नमुना 8 अ मध्ये अर्ज करता येईल, असे त्यांनी
सांगितले.