नियोजन समितीत ‘राजकीय नियोजन’
By admin | Published: March 29, 2016 11:29 PM2016-03-29T23:29:24+5:302016-03-30T00:08:37+5:30
निमंत्रित सदस्य नियुक्त : भाजपचे आठ, शिवसेनेचे तीन सदस्य, स्वाभिमानी, रिपाइंला डावलले
सांगली : नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांच्या निवडी करताना भाजपने जिल्ह्यातील राजकीय नियोजनही साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपमध्ये नाराज असलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील यांची निवड करतानाच जिल्ह्यातील भाजपच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनाही सामावून घेतले आहे. शिवसेनेला तीन जागा देण्यात आल्या असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं या दोन्ही घटक पक्षांना डावलण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या. समितीच्या सभा होऊनही त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांच्या सदस्यांसह ११ विशेष निमंत्रित सदस्य तसेच दोन नियोजन समितीचा अभ्यास असणारे दोन सदस्य यांचा समावेश असतो. अन्य निवडी करताना विशेष निमंत्रितांच्या निवडी प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी या निवडीला मुहूर्त मिळाला.
भाजपचे आठ आणि शिवसेनेचे तीन सदस्य या समितीत घेण्यात आले आहेत. अजितराव घोरपडे, दिनकर पाटील यांच्यासह भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, वायफळे (तासगाव) येथील खासदार संजय पाटील यांचे कट्टर समर्थक सुखदेव पाटील, आटपाडीचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत देशमुख, जतचे नगरसेवक व आ. विलासराव जगताप यांचे समर्थक उमेश सावंत, इस्लामपूरचे भाजयुमोचे विक्रमभाऊ पाटील, सांगलीचे हणमंत पवार अशा आठ भाजप सदस्यांची निवड झाली आहे.
शिवसेनेलाही तीन जागा देण्यात आल्या असून, यामध्ये जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सांगलीचे अजिंक्य पाटील आणि माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांचा समावेश आहे. नियोजन समितीच्या निवडीतून भाजपने शिवसेनेचे समाधान केले असले तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला डावलले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतून भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
अनोखी मोट बांधण्याचा प्रयत्न...
सदस्य निवडीत मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, आटपाडी या तालुक्यातील लोकांचा समावेश केला आहे. खासदार, आमदार यांचा या निवडीवर मोठा प्रभावही दिसत आहे. नेत्यांचे कट्टर समर्थक, पक्षाचे निष्ठावंत आणि नाराज अशा सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दलित कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसने जसा निवडणुकीपुरता वापर केला, तसाच वापर आता भाजपवाले करीत आहेत. दलित कार्यकर्त्यांना समितीवर न घेण्याचा हा निर्णय त्यांच्या राजकीय वृत्तीचे दर्शन घडविणारा आहे. भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना डावलले आहे. रामदास आठवले समर्थक कार्यकर्ते यामुळे दुखावले गेले आहेत.
- जगन्नाथ ठोकळे,
जिल्हा अध्यक्ष, रिपाइं, सांगली
नाराजांना गोंजारले : नेत्यांची खेळी
भाजपमध्ये सध्या नाराजी वाढत होती. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले माजी आमदार दिनकर पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी नुकतीच काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांची भेट घेतली होती. या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. या दोन्ही नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचीही चर्चा रंगली होती. आता नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांमध्ये या दोन्ही नेत्यांचा समावेश करून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे.
आम्ही सत्तेत आहोत, याचे भान भाजपला नाही. ‘वापरा आणि सोडून द्या’ ही त्यांची नीती आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद मोठी असताना, जिल्हा नियोजन समितीत संघटनेचा एकही सदस्य न घेणे चुकीचे आहे. भाजपच्या या राजकारणाबद्दल संघटनेतून संताप व्यक्त होत आहे.
- महेश खराडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना