इस्लामपुरातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर-सोशल मीडियावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:16 AM2018-04-11T01:16:16+5:302018-04-11T01:16:16+5:30
इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्येही उमटू लागले आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आघाडीचे सरकार गेल्यानंतर पाटील यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी देऊन राष्ट्रवादीने त्यांचा सन्मान केला आहे. भाजपची सत्ता आली आणि शेतकरी चळवळीतील नेते सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. याबद्दल पाटील यांनी खोत यांचा सन्मानही केला. परंतु अलीकडील काही महिन्यात खोत आणि काही भाजपमधील नेत्यांनी राष्टÑवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले. यामुळे खोत आणि पाटील यांच्यातील मतभेद वाढत गेले.
दिलीप पाटील यांनी नुकत्याच झालेल्या हल्लाबोल यात्रेत खोत यांचा खरपूस समाचार घेतला. याला खोत आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिले. मात्र या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे.
मधील काळात मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीच प्रथम क्रमांकाचा शत्रू मानून आ. जयंत पाटील यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खतपाणी घातले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खोत यांनी शक्तिप्रदर्शन केले. तेथेही आ. पाटील यांनाच टार्गेट केले जात होते. याचा राग आ. पाटील यांचे समर्थक दिलीपतात्या पाटील यांनी हल्लाबोल यात्रेत काढला. आता पाटील आणि खोत यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन हल्लाबोल यात्रेच्या गर्दीवरून टोमणे मारले.
दिलीपतात्या पाटील यांनाही टार्गेट केले. आता दोघांच्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोशल मीडियावर नेऊन त्याला वैयक्तिक स्वरूप दिले आहे. पाटील यांचे पुत्र क्रांतिप्रसाद यांनी सोशल मीडियावरून प्रसाद पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. शिवाय रयत क्रांती संघटनेचे गणेश शेवाळे यांचाही समाचार घेतला आहे.
सभेच्या गर्दीवरून सुरू झाले युद्ध
सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास गर्दी व्हावी, यासाठी बाहेरील लोक आयात केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्याचा वचपा म्हणून हल्लाबोल यात्रेतील गर्दी पाहून हे लोक बाहेरून आणल्याचा पलटवार खोत यांच्या समर्थकांनी केला. यातूनच सध्या सोशल मीडियावर ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे.