Sangli: बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा!; कुस्ती आखाड्यात नेत्यांची जुगलबंदी अन् टोलेबाजी
By हणमंत पाटील | Published: January 25, 2024 03:42 PM2024-01-25T15:42:44+5:302024-01-25T15:43:57+5:30
'तुमच्या दोघांच्या नादात मी माझा अपघात होऊ देणार नाही'
सांगली : तुम्ही राजकारणातील महाराष्ट्र केसरी व्हा अन् तुमच्या आशीर्वादाने आम्हाला सांगली केसरी होऊ द्या, असे आवाहन खासदारकीसाठी इच्छुकांनी केले. त्यावर तुमच्या दोघांच्या नादात मी माझा अपघात होऊ देणार नाही. डावीकडे व उजवीकडे न पाहता गाडी सरळ चालविणार अशी टोलेबाजी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
येतगाव (ता. कडेगाव) येथे सरपंच अर्जुन कापसे यांनी कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवारी भरविले होेते. मैदानाच्या आखाड्यातच माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, लोकसभेसाठी इच्छुक कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी व टोलेबाजी चांगलीच रंगली. त्याला हसून दाद देत कुस्तीच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला.
कुस्तीच्या मैदानावरील मंचावर बाळासाहेबांच्या (डॉ. विश्वजित कदम) उजव्या (चंद्रहार पाटील) व डाव्या बाजूला (विशाल पाटील) हे दोन्ही पैलवान बसल्याची पहिली टिप्पणी जितेश कदम यांनी मनोगतात केली. त्यावर शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून पैलवान चंद्रहार लोकांना भेटून त्यांच्या कामासाठी पुढे येत आहे. कारण आताचा खासदार बिनकामाचा आहे म्हणून ते लोकसभेसाठी इच्छुक झाले आहेत. बाळासाहेब, तुम्ही पैलवान व माझ्या कोणाच्याही पाटी उभे राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. या मंचावरचा एक माणूस निश्चित खासदार होणार, असा विश्वास विशाल पाटील यांनी भाषणात व्यक्त केला. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
माझी गाडी धडकवायची नाही..
‘डॉ. विश्वजित कदम या भावी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मंचावर उपस्थित आहोत. बाळासाहेब, तुमच्या उजव्या बाजूला पैलवान आणि डाव्या बाजूला मी बसलो आहे. आता तुम्ही डावीकडे बघा की उजवीकडे आम्ही तुमच्याबरोबरच आहोत,’ असे विशाल पाटील यांनी आश्वस्त केले. आता उजवीकडे बघायचे की डावीकडे हे मलाच कळेना. मी शिकलोय, गाडी चालविताना इकडे तिकडे बघायचं नसतं, सरळ बघायचं असतं. नाहीतर गाडी धडकते. मला तुमच्या नादात माझी गाडी धडकवायची नाही. कारण दोन्ही पैलवान तेल लावलेले आहेत, अशी टोलेबाजी बाळासाहेबांनी केली. त्यावर बोलताना चंद्रहार पाटील यांनी आणखी राजकीय कडी केली. ते म्हणाले, ‘काही हरकत नाही बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा.’