राजकारणीच आमच्यापेक्षा उत्तम अभिनेते - प्रशांत दामले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:49 PM2023-11-06T12:49:06+5:302023-11-06T12:49:45+5:30
गुळाचा गणपती होणार नाही
सांगली : नाट्यचळवळ वाढवायची असेल आणि त्यासाठी पाठबळ मिळण्यासाठी राजकीय व्यक्तींनी आवर्जून नाटक बघणे आवश्यक आहे. नाट्यगृहातील किमान समस्या बघून त्या सोडविल्या तरी कलाकारांना हुरूप मिळत असतो. कलाकारांना केवळ तीन तासांसाठी नाटक करावे लागते. मात्र, तोच तो चेहरा ठेवून २४ तास अभिनय करणारे राजकीय नेतेच उत्तम अभिनेते असतात यासाठी त्यांना सलामच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी रविवारी सांगलीत केले.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरव पदक स्विकारल्यानंतर आयाेजित मुलाखतीवेळी ते बोलत होते. ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विचारलेल्या खुमासदार प्रश्नांना तितक्याच दिलखुलासपणे दामले यांनी उत्तरे देत सांगलीकर रसिकांची मने जिंकली.
दामले म्हणाले की, कोणतीही कलात्मक चळवळीला राजकीय पाठबळ आवश्यक असते. यासाठीच राजकीय नेत्यांनी नाटके बघावीत. या क्षेत्रातील अडचणी त्याशिवाय त्यांच्या ध्यानात येणार नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे नाट्यगृहात येऊन नाटक बघत असत.
नाट्यचळवळीच्या प्रश्नावर दामले म्हणाले की, देशात केवळ महाराष्ट्र आणि बंगाल या ठिकाणीच नाट्य चळवळीला समृद्ध पावणेदोनशे वर्षांचा इतिहास आहे. ही परंपरा जतन करायला हवी. अलीकडे नाटकांना प्रेक्षक मिळत नाहीत, अशी चर्चा होत असलीतरी यात तथ्य वाटत नाही. कारण जर दर्जेदार आणि प्रेक्षकांची मानसिकता ओळखून नाटक लिहिले आणि सादर केले तर त्याला प्रतिसाद मिळतो हे सिद्ध झाले आहे. राज्यात ४८ अशी ठिकाणे आहेत ज्याठिकाणी नाटकांचे प्रयोग होऊ शकतात आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही मिळतो. अशा ठिकाणी दर्जेदार नाट्यगृहे उभारली अथवा आहेत त्या नाट्यगृहातील समस्या सोडविल्या तरीही नाटकांना प्रतिसाद वाढणार आहे.
रंगभूमीवर इतकी वर्षे काम करताना सर्वात आनंदाचा हा क्षण असून, नाट्यपंढरी सांगलीतील या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते दामले यांना भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, डॉ. भास्कर ताम्हनकर, विलास गुप्ते, मेधा केळकर, जगदीश कराळे, विवेक देशपांडे, बलदेव गवळी, आनंदराव पाटील, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते.
नाट्यगृह उभारताना ‘जाणत्या’ लोकांना विचारा
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मनोगतात सांगलीत लवकरच २५ कोटी रुपयांचे सुसज्ज नाट्यगृह उभारले जाणार असल्याचे सांगितले. यावर दामले यांनी नाट्यगृह उभारताना आर्किटेक्टपेक्षा कलाकारांचा सल्ला जरूर घ्या. त्या स्टेजवर जे कलाकार काम करणार आहेत त्यांनाच त्यातील समजते. यावेळी खाडे यांनी विष्णूदास भावे नाट्यमंदिरासह मिरज येथीलही नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येईल, असे सांगितले.
सांगलीत ‘बंगाली’चा ‘मद्रासी’ झालो
१९८३ मध्ये सांगलीत झालेल्या ‘टूरटूर’ नाटकाच्या प्रयोगावेळचा किस्सा प्रशांत दामले यांनी सांगितला. या नाटकात बंगाली व्यक्तीचा मी रोल करत होतो. प्रयोगावेळी मद्रासी व्यक्तीचा काम करणारा कलाकार अचानक आला नाही. त्यामुळे सुधीर जोशी, विजय केंकरे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मद्रासीची भूमिका मला करायला लावली. मेकअपमनने पूर्ण काळे केले होते. मात्र, त्यावेळच्या उकाड्यामुळे माझा तो रंग जाऊन गोरागोमटा झालो होतो.
गुळाचा गणपती होणार नाही
नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष व्हायला आवडेल का प्रश्नावर प्रशांत दामले म्हणाले की, चळवळीतील जुन्या-जाणत्यांना या पदावर संधी मिळावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा उपयोग होतो. मलाही अध्यक्ष व्हायला आवडेल, मात्र गुळाचा गणपती होण्यापेक्षा त्या पदाचा कलाकारांसाठी उपयोग करून घेता आला पाहिजे.