कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

By अविनाश कोळी | Published: September 14, 2024 06:42 PM2024-09-14T18:42:48+5:302024-09-14T18:46:05+5:30

मोहन देशमुख यांच्या आत्मचरित्राचे सांगलीत प्रकाशन

Politicians don't know where to stop, because Jayant Patil expressed his opinion | कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

कुठे थांबायचे हे देशमुखांना कळलं; पण राजकारण्यांना कळणार नाही - जयंत पाटील 

सांगली : बांधकाम व्यवसायात शिखर गाठूनही मोहन देशमुख यांनी कुठे थांबायचे हे ठरविले होते. त्याप्रमाणे ते थांबले. राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही. कारण या क्षेत्रात निवृत्ती नसते, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले.

सांगलीचे मोहन देशमुख यांच्या ‘कृष्णाकाठावरून सांगली ते मुंबई’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जयंत पाटील व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते शनिवारी सांगलीच्या रोटरी सभागृहात पार पडले. यावेळी जयश्री देशमुख, सुरेश देशमुख, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, पत्रकार अशोक घोरपडे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, भौतिक गोष्टींपासून माणूस दूर जात नसल्यामुळे समृद्ध जीवनाचा त्याला मार्ग सापडत नाही. या गोष्टीचे भान ठेवून देशमुख यांनी आयुष्य समृद्ध केले. बिल्डर असतानाही त्यांनी वाममार्गाने कामे करण्याची मानसिकता कधीही बाळगली नाही. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांचे बरेच प्रस्ताव मंजूर केले. असा प्रामाणिकपणा सध्या दुर्मीळ आहे.

केतकर म्हणाले की, माणसांची आर्थिक, भौतिक समृद्धी वाढत असताना सामाजिक समृद्धी घटत चालली आहे. चाळींची जागा सोसायट्यांनी घेतल्यानंतर माणसांमधला दुरावा वाढत गेला. देशमुख यांनी आयुष्याची समृद्धी कशात आहे, हे ओळखले. त्यामुळे त्यांचे पुस्तक केवळ सांगलीचा कृष्णाकाठ किंवा मुंबईची कहाणी नाही, तर जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारा ऐवज आहे.

काँग्रेसची गादी घेऊन मुंबईला

मोहन देशमुख यांनी सांगितले की, पदवीधर झालो त्यावेळी सांगलीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यासाठी हजारो गाद्या आणल्या हाेत्या. काही कारणांनी तो कार्यक्रम रद्द झाला आणि वसंतदादा कारखान्याच्या सभासदांना त्या गाद्यांचे वाटप झाले. माझे वडील सभासद असल्याने ती गादी मिळाली. काँग्रेसची ही गादी व ७५ रुपये घेऊन मी मुंबईत आलो आणि बांधकाम क्षेत्रात यश मिळविले. त्यांच्या या वाक्यावर हशा पिकला.

नंदू नाटेकरांच्या नावे अकॅडमी हवी

जागतिक स्तरावर बॅडमिंटनच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावणारे नंदू नाटेकर सांगलीचे आहेत. मात्र, त्यांच्या नावे सांगलीत एखादी अकॅडमीही उभारली गेली नाही. भविष्यात तरी त्यांच्या नावे अकॅडमी उभी करावी, अशी सूचना केतकर यांनी केली.

Web Title: Politicians don't know where to stop, because Jayant Patil expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.