देशातील जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक : श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:19 AM2017-12-26T01:19:27+5:302017-12-26T01:23:27+5:30
इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत
इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत. या प्रवृत्तींच्या माध्यमातून सुरु असलेले जातीविद्वेषाचे राजकारण बंधुतेला घातक आहे. अशावेळी सर्व महापुरुषांना बंधुतेच्या धाग्यात गुंफून एकात्मिक मानवतावादाच्या सूत्राने भारताला तत्त्वज्ञानात्मक महासत्ता बनविण्यासाठी बंधुतेचा विचार जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या एकोणीसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांना ‘राष्ट्रीय बंधुता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सरोज पाटील, प्रकाश रोकडे, महेंद्र भारती, संमेलनाध्यक्ष उध्दव कानडे, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सबनीस म्हणाले, देशातील सध्याचा कालखंड हा जातीय संघर्षाचा आहे. प्रत्येक धर्मात आक्रमक मूलमतत्त्ववाद फोफावत आहे. राज्यकर्ते संविधानाच्या पवित्रतेची लाज गुंडाळून लोकशाहीची विटंबना करत आहेत. सत्य अंग चोरुन उभे आहे. हिंसा ही कोणत्याही धर्माला मान्य नाही. त्यामुळे बंधुतेच्या निकषावर धर्माची चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. संवादाशिवाय समता आणि बंधुता शक्य नाही. बंधुतेचा विचार जीवनाला विकसित करणारा आहे. त्याची जोपासना करणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, धर्म-जाती या माणसानेच निर्माण केल्या आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्याचा त्यांचा हा चिरेबंदी खेळ असतो. धर्माच्या नावावर समाज दुभंगून टाकला जात आहे. जाती-धर्माच्या तावडीतून सुटल्याशिवाय तुम्हाला माणूस बनता येणार नाही. आपले विचारधन हे माणुसकी जपणारे असावे. त्यासाठी ‘मी माणूस आहे’ एवढे धाडसाने म्हणण्याचा गर्व बाळगा. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-पातीच्या विध्वंसाची मोहीम राबवून प्रत्येकाला त्याचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, स्त्रियांना माणूसपणाकडे घेऊन जाणारी विचारधारा उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. जीवनाच्या दोन गटांमध्ये विभागलेल्या स्त्रियांना विकासाच्या मध्यप्रवाहात आणण्याची जबाबदारी बंधुता संमेलनाने घ्यावी. स्त्रियांना अत्याचारापासून मुक्त करुन भगिनी बंधुतेचा नवीन प्रयोग सुरु करणे गरजेचे आहे.
समारोपापूर्वी एम. डी. पवार पीपल्स बँकेला ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क’ पुरस्कार देण्यात आला. वैभव पवार यांनी तो स्वीकारला. तसेच हडपसरच्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेस दिलेला ‘स्वामी विवेकानंद’ पुरस्कार शिवाजीराव पवार यांनी स्वीकारला.
त्यानंतर प्रा. जे. पी. देसाई यांनी ‘स्वामी विवेकानंदांचे बंधुतामय तत्त्वज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक धर्मवासीयांनी आपल्या धर्माचे आचरण करताना दुसºया धर्मातील जी चांगली तत्त्वे आहेत ती स्वीकारली, तरच जगाचा विकास शक्य आहे. पावित्र्य, शुध्दता आणि दयाशीलता ही तत्त्वे कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म जगन्मान्य केला तरी जागतिक व्यासपीठावर त्यांनी सर्वधर्मसमभावाचे तत्त्वज्ञान मांडले. मानवनिर्मित विषमता नष्ट करणे ही समता ठरते.
डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रकट मुलाखत घतली. वैशाली जौंजाळ यांनी ‘पाझर’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. नगरसेवक शहाजी पाटील, अॅड. एन. आर. पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिवाजीराव पवार, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. सौ. कल्पना मोहिते उपस्थित होत्या.
अध्यक्षपदी : सबनीस यांची निवड
बंधुता साहित्य परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी बंधुता संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडीवरुन कधीही निवडणूक अथवा वाद होत नाहीत, असे सांगत, पिंपरी-चिंचवड येथे होणाºया २० व्या बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड जाहीर केली.
धोंगडेंची दानत...!
व्यासपीठावर राष्ट्रीय बंधुता पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पुरोगामी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी आपल्या भाषणावेळीच पुरस्कारातून मिळालेल्या ५ हजार रुपयांच्या रकमेत स्वत:चे ५ हजार रुपये घालून १० हजार रुपयांची देणगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र भारती व प्रकाश रोकडे यांच्याकडे सुपूर्द करुन आपली दानशूरता दाखवून दिली.