जेजुरी गडावरच्या कार्यक्रमावरून सांगलीत राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:23+5:302021-02-14T04:24:23+5:30
सांगली : पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणाच्या वादावरून सांगलीतील राजकारण पेटले आहे. सांगलीचे असलेले ...
सांगली : पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणाच्या वादावरून सांगलीतील राजकारण पेटले आहे. सांगलीचे असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याहस्ते अनावरणास केलेल्या विरोधावरून जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे.
जेजुरी गडावर देवस्थानच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व छत्रपती संभाजीराजे यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमापूर्वीच शरद पवारांना विरोध करीत पडळकरांनी पुतळा अनावरणाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीतून संताप व्यक्त होत आहे.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, पडळकर म्हणजे अदखलपात्र व्यक्ती आहे. केवळ प्रसिद्धीपोटी त्यांचे शरद पवार व जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करण्याचे उद्योग सुरू आहेत. जनता त्यांची पात्रता ओळखून आहे. ज्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत डिपॉझीट जप्त होते, अशा व्यक्तीची दखल जनतासुद्धा घेत नाही.
युवक काँग्रेसचे अजित दुधाळ म्हणाले की, जेजुरी देवस्थानने तो कार्यक्रम घेतला होता. त्यांनी काढलेल्या पत्रिकेत छोटे निमंत्रक म्हणून पडळकरांचे नाव टाकल्यामुळे त्यांना राग अनावर झाला आहे. जेजुरी गडावर अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याने राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील धनगर समाजाची मान अभिमानाने उंचावत आहे. अशा कार्यक्रमास गालबोट लावण्याचा उद्योग पडळकरांनी करून त्यांनी त्यांच्यादृष्टीने समाजापेक्षा राजकारण श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. बिरोबाची खोटी शपथ खाऊन यापूर्वीच समाजाच्या मनातून त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची ही स्टंटबाजी लोक ओळखतात.
चौकट
जयंतरावांचीही टीका
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जळगाव येथील दौऱ्यावरील पडळकर यांची कृती हास्यास्पद व केविलवाणी असल्याची टीका केली. पडळकर हे प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.