NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:53 PM2022-11-07T17:53:22+5:302022-11-07T17:56:46+5:30

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत

Politics in BJP-NCP in Sangli district | NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

googlenewsNext

दत्ता पाटील

तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावून खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा नगराध्यक्ष केला. यामुळे भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत आले. राष्ट्रवादीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फुटीचा, तर भाजपमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडून इनकमिंग करण्याचा पायंडाच बनल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांची परिस्थिती पाहता तर खासदार गटाला निवडणुकीत, तर आमदार गटाला सत्तेत आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व गट अशी निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. पक्षांतर्गत धोरणानुसार नगराध्यक्ष बदलाचा निर्णय झाला. पुढील नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा घेत खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली.

खासदारांच्या फोडाफोडीनंतर आमदार विरुद्ध खासदार गटातील राजकारण चर्चेत आले. मात्र, दोन्ही गटातील फुटाफुटीचा जुनाच पायंडा कायम राहिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.

तासगाव नगरपालिकेत आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील गटात फूट पडल्यानंतर खासदार गटाने फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिला प्रयत्न अपयशी ठरला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात खासदार गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडून भाजपचा नगराध्यक्ष केला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण तासगावचीच पुनरावृत्ती असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या रिंगणात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

का आहे आत्मपरीक्षणाची गरज?  

आमदार गट : आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव कवठेमहांकाळ-मधील आबा गट संपेल अशी चर्चा असतानादेखील आबा गटाचे अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. किंबहुना अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत आबा गटाला घवघवीत यश मिळाले. मात्र निवडणुकीत एकनिष्ठ असणारे अनेक पदाधिकारी, पदावर गेल्यानंतर नाराजीचा सूर ओढून भाजपशी जवळीक करत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येत आहे. त्यामुळेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार गट किंबहुना रोहित पाटील यांना आहे.

खासदार गट : राज्यात सत्तेत असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक नसतानादेखील खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिकेची सत्ता काठावर मिळाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बहुमत मिळवण्यात अपयश आले. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवर भिस्त ठेवणाऱ्या खासदार गटाला निवडणुकीच्या रिंगणात वर्चस्व सिद्ध करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे.

Web Title: Politics in BJP-NCP in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.