इस्लामपुरात लॉकडाऊनचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:27+5:302021-05-05T04:44:27+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे नगरपालिकेने ऑनलाइन सभा घेऊन ...

The politics of lockdown in Islampur | इस्लामपुरात लॉकडाऊनचे राजकारण

इस्लामपुरात लॉकडाऊनचे राजकारण

Next

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे नगरपालिकेने ऑनलाइन सभा घेऊन शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा करून पूर्ण जिल्ह्यातच आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे पालिकेचा निर्णयच मोडीत निघाला आहे.

इस्लामपूर शहरात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू होत्या; परंतु इतर साहित्याच्या दुकानदारांनी शटर अर्धे उघडून विक्री सुरू केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक शहरात गर्दी करू लागले. या गर्दीपुढे पालिका आणि पोलिसांनी हात टेकले. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. रुग्णांना बेड मिळेनात. नॉनकोविड रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. विरोधकांनी पालकमंत्र्यांना ‘टार्गेट’ केले.

पालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीने तातडीने ऑनलाइन सभा घेऊन मंगळवार, दि. ४ मेपासूनच चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला.

सर्व व्यवहार बंद आणि शहराच्या सीमा सील, असे मुख्याधिकारी रवींद्र माळी यांनी जाहीर केले. त्यामुळे सोमवारी (दि.३) खरेदीसाठी शहरातील सर्वच रस्ते फुलून गेले होते. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी इस्लामपुरातील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी सहा जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. जिल्ह्यात इस्लामपूर येथील कोरोना मृत्यूदर जादा आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी बुधवार ५ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने पालिकेचे निर्णय मोडीत निघाला; परंतु यामुळे इस्लामपूर आणि परिसरात संभ्रम निर्माण झाला होता.

Web Title: The politics of lockdown in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.