धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:35 AM2023-10-09T11:35:52+5:302023-10-09T11:36:14+5:30

पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण 

Politics of Muslim issues only because there is no religion says Abhiram Bhadkamkar | धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

googlenewsNext

सांगली : मुस्लिम चळवळींनी समाजसुधारक व साहित्यिक असलेल्या हमीद दलवाईंचा हात सोडला. तसेच धर्मचिकित्सा न झाल्याने मुस्लिमांचे प्रश्न राजकीय बनले आहेत. हिजाबसारखे विषय केंद्रीभूत ठरत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी व लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.

सांगलीत रविवारी संस्कार भारतीच्या ३१ व्या वर्धापन सोहळ्यात लेखिका, अभिनेत्री चेतना वैद्य यांनी भडकमकर यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ अध्यक्षस्थानी होते.

यावेळी गायिका श्रद्धा जोशी-दांडेकर व तबलावादक नीलेश काळे यांना गाडगीळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भडकमकर म्हणाले, मुस्लिमांच्या प्रश्नांमध्ये वातावरण आणि शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मदरशातील शिक्षणाऐवजी उपयुक्त व ऊहापोह झालेले शिक्षण द्यायला हवे. पण धर्मचिकित्सा न होता हा राजकीय विषय झाला आहे. मला मुस्लिमांचे प्रश्न माहिती आहेत. हिंदू धर्माला संतांनी अनेक शिव्या दिल्या, पण त्यामागे तळमळ होती.

ते म्हणाले, सध्याचे पुरोगामित्व भंजाळलेले व भरकटलेले आहे. विद्वान गणेश देवी यांनी भाजपचा पराभव म्हणजे पुरोगामीत्व असे विचित्र विधान पुण्यात केले. पण हे पुरोगामित्व नव्हे. त्याची नक्की व्याख्या काय? यावर चर्चा होत नाही. आपल्या देशाला कोणी पुरोगामीत्व शिकविण्याची गरज नाही.

उर्वी मराठे हिने ध्येयगीत गायिले. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. अभय भंडारी, संतोष बापट, परागेश जोशी, कविता कुलकर्णी, सुहास पंडित आदींनी संयोजन केले.

हुसेन आणि वादग्रस्त चित्रे

भडकमकर म्हणाले, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी नग्न सरस्वतीचे चित्र काढले. विरोध झाला तरी ठाम राहिले. आपण `आविष्कार स्वातंत्र्याचा योद्धा` म्हणून त्यांचा गौरव केला. हुसेन यांनी अन्य धर्मावरही अशीच कलाकृती केली, तेव्हा त्यांना `हे चालणार नाही` असे सांगितले गेले. तेव्हा त्यांनी कलाकृती मागे घेतली.

वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेत

भडकमकर म्हणाले, लेखक धोका पत्करून लिहायला तयार आहेत, पण वाहिन्यांनी स्वातंत्र्य दिले पाहिजे. हल्ली वाहिन्यांना रायटर नकोत, टाईपरायटर हवेत. लेखकांचे हात बांधून ठेवलेत. वाहिन्यांनी धोका पत्करला पाहिजे. गेल्या काही वर्षात त्यांचा आकार मोठा झाला, पण आशयाने मोठ्या झाल्या नाहीत. पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण सुरु आहे. वाहिन्यांनी लेखक, कलाकार, दिग्दर्शकांवर विश्वास ठेवायला हवा.

Web Title: Politics of Muslim issues only because there is no religion says Abhiram Bhadkamkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.