सांगली अर्बनसाठी २६ जून, तर शिक्षक बँकेसाठी ३ जुलैला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:11 PM2022-05-19T15:11:14+5:302022-05-19T15:11:41+5:30
दोन्ही बँकेच्या निवडणुका दुरंगी, तिरंगी होण्याची शक्यता आहे.
सांगली : सांगली अर्बन को-ऑप बँक व प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा बुधवारी बिगुल वाजला. सांगली अर्बन बँकेसाठी २६ जूनला, तर शिक्षक बँकेसाठी ३ जुलैला मतदान होत आहे. पुढील आठवड्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. दोन्ही बँकेच्या निवडणुका दुरंगी, तिरंगी होण्याची शक्यता आहे.
सांगली अर्बन व शिक्षक बँकेच्या निवडणुका कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर गेल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दोन्ही बँकांसाठी बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सांगली अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी २० मेपासून २६ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. २७ मे रोजी छाननी, १३ जूनपर्यंत अर्ज माघार तर, १४ जून रोजी चिन्ह वाटप आणि २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर २८ जून रोजी मतमोजणी होईल.
सत्ताधारी गणेश गाडगीळ विरुद्ध माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी या दोन गटांत ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी निवडणूक बिनविरोध होण्याबाबतही चर्चा सुरू होती. पुजारी पॅनेलने सत्ताधाऱ्यांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करण्याची हमी दिली आहे. पण अद्यापपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोणताही प्रस्ताव विरोधकांकडे दिलेला नाही. त्यामुळे सांगली अर्बनची निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला. २७ मे ते २ जूनपर्यंत अर्ज दाखल, ३ जूनला छाननी, ६ ते २० जूनपर्यंत अर्ज माघारी, २१ जूनला चिन्ह वाटप आणि ३ जुलैला मतदान होणार आहे. शिक्षक बँकेची मतमोजणी ५ जुलै रोजी आहे. ही निवडणूक तिरंगी होणार आहे. सत्ताधारी शिक्षक समितीविरोधात शिक्षक संघ थोरात गट व शिक्षक संघ शि. द. पाटील गट या पारंपरिक लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- सांगली अर्बन बँक (१७ जागा)
- अर्ज भरण्याची मुदत : २० ते २६ मे
- अर्जाची छाननी : २७ मे
- अर्ज माघारी : ३० मे ते १३ जून
- मतदान : २६ जून
- मतमोजणी : २८ जून
- प्राथमिक शिक्षक बँक (२१ जागा)
- अर्ज भरण्याची मुदत : २७ मे ते २ जून
- अर्जाची छाननी : ३ जून
- अर्ज माघारी : ६ ते २० जून
- मतदान : ३ जुलै
- मतमोजणी : ५ जुलै