कृ ष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:06 PM2019-01-20T23:06:15+5:302019-01-20T23:06:21+5:30
सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला ...
सांगली : जिल्ह्यातील शेकडो गावांतून दररोज पत्रात मिसळणारे कोट्यवधी लिटर सांडपाणी, जलपर्णी, शेवाळाचा थर, तसेच निर्माल्याच्या माध्यमातून निर्माण झालेला कचरा अशा अनेक दुर्गंधीयुक्त गोष्टींना पोटात घेऊन वाहणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.
नदीकाठच्या अनेक गावांतील व शहरातील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. केवळ एका सांगली शहरातून दररोज ५ कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढतच आहे. नदीच्या पाण्याचा वासही उग्र येत आहे. महापालिकेतर्फे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नदी पात्रातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले आहेत.
कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करून जिल्ह्याबाहेर पडेपर्यंत शेकडो गावांचे सांडपाणी पोटात घेते. काही कारखान्यांचे केमिकलयुक्त व दूषित पाणी थेट नदीपात्रात येऊन मोठ्याप्रमाणात मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी, केंदाळ उगविले आहे. पाण्यावर हिरव्या रंगाचा प्रदूषित थर दिसत आहे.
जनावरे धुणे, धार्मिक कार्यक्रमानंतर नदीत वस्तू विसर्जन करणे, विविध प्रकारचा कचरा टाकणे, निर्माल्य विसर्जित करणे यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. कृष्णा नदी स्वच्छतेबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही निती आयोगाने दिले होते. जुलै २0१८ मध्ये याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही या अहवालाचे घोडे अडलेलेच आहे. अहवालाची ही अवस्था, तर स्वच्छता कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.