पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, १५ दिवसांत ५ टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:09+5:302021-07-16T04:19:09+5:30

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीही गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १५ ...

Polytechnic system will deteriorate, only 5% of students will apply in 15 days | पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, १५ दिवसांत ५ टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज

पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, १५ दिवसांत ५ टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज

Next

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीही गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पुरेसा दिसत नाही. त्यामुळे यावर्षीही प्रवेशाचे तंत्र बिघडण्याची चिन्हे आहेत.

३० जूनपासून तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागलेला नव्हता, तरीही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने केले होते. त्यानुसार ऑनलाइन पोर्टल सुरूदेखील झाले. दहावीच्या परीक्षा मंडळाने दिलेला आसनक्रमांक नोंदवून अन्य सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यामध्ये आधार कार्डापासून जातीचा दाखला, क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांचा समावेश आहे. तंत्रनिकेतन स्तरावर त्याची छाननी झाल्यानंतर त्रुटींची माहिती दिली जाते. त्रुटी पूर्ण केल्यानंतर प्रवेश निश्चित होतो. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.

विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाविषयी अंदाज नसल्याने ते गोंधळात आहेत. किती टक्के गुण मिळणार यावरच त्यांचा पुढील शिक्षणक्रम निश्चित होणार आहे. दहावीच्या मूल्यांकनाच्या नव्या पॅटर्ननुसार यंदा न १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अकरावीच्या जागा हाऊसफुल्ल होतील. परिणामी तंत्रनिकेतनकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असेल, पण टक्केवारीविषयी विद्यार्थ्यांना काहीही अंदाज नसल्याचे प्रवेशाबाबत ते अंधारात चाचपडत आहेत. निकाल जास्त लागण्याने पदविका अभियांत्रिकीच्या सरकारी व खासगी जागा १०० टक्के भरण्याची महाविद्यालयांना अपेक्षा आहे.

बॉक्स

दहावी निकालानंतर येणार गती

- पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाला दहावीच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने गती येणार आहे. शुक्रवारी (दि. १६) दहावीचा निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर होईल.

- मूल्यांकनाचा नवा पॅटर्न विद्यार्थ्यांना भलताच फलदायी होणार आहे. सर्रास विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत, त्यामुळे प्रवेशासाठी रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे.

- दहावीत किती गुण मिळतील यावर पुढील शिक्षणक्रमाची दिशा निश्चित होते, त्यामुळेही पदविका प्रवेशाचे नेमके चित्र दहावीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

बॉक्स

गेल्यावर्षी ५० टक्के जागा रिक्त

गेल्यावर्षी दहावीचा निकाल उच्चांकी लागला होता, तरीही पदविका अभियांत्रिकीच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. सर्व सरकारी महाविद्यालये आणि काही प्रतिष्ठित खासगी महाविद्यालयांमध्ये जागा फुल्ल झाल्या, पण अन्य खासगी महाविद्यालयांना मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी बऱ्याच कसरती कराव्या लागल्या. त्यानंतरही काही विशिष्ट ट्रेडच्या जागा रिकाम्याच राहिल्या होत्या.

बॉक्स

फेब्रुवारीमध्येच मिळालेत आसनक्रमांक

- अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी दहावीच्या निकालापूर्वीच ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीचे गुण समजले नसले तरी बोर्डाने दिलेला आसनक्रमांक पुरेसा ठरणार आहे.

- बोर्डाने सर्वच विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्येच आसनक्रमांक दिले आहेत. त्याच्याआधारे तोंडी परीक्षाही झाल्या आहेत. हा क्रमांक पदविकेसाठी नोंदवावा लागेल.

कोट

दहावीच्या निकालावरच पुढील प्रवेश

दहावीचा निकाल अद्याप लागलेला नाही, त्यामुळे किती टक्के गुण मिळणार याचा अंदाज नाही. चांगले गुण मिळाले तरच डिप्लोमाला प्रवेश घेणार आहे, अन्यथा अकरावीकडे वळावे लागेल. दहावीची परीक्षा न झाल्याने टक्केवारीविषयी अंधारात आहे, त्यामुळे कोणत्याही प्रवेशाविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

- विनय बसागरे, विद्यार्थी, मिरज

डिप्लोमासाठी प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे. दहावीला चांगले गुण मिळण्याची अपेक्षा आहे. एकूण निकाल चांगला लागणार असल्याने डिप्लोमाचे मेरीट वाढू शकते, त्यामुळे मला कमी गुण मिळाले तर अन्य पर्याय शोधावे लागतील. खासगी महाविद्यालयांचे शुल्क परवडणारे नाही.

- नेहा गोसावी, विद्यार्थिंनी, कुपवाड

डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच सुरू झाली आहे, त्यासाठी कोणतीही सीईटी देण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाची वाट न पाहता ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी दहावीचा बोर्डाने दिलेला आसनक्रमांक पुरेसा आहे.

प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे, नोडल अधिकारी तथा प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज पॉईंटर्स

जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - १६

प्रवेशक्षमता ४, ६२८

दरवर्षीचे सरासरी प्रवेश २,३००

अर्ज करण्याची अखेरची मुदत २३ जुलै

Web Title: Polytechnic system will deteriorate, only 5% of students will apply in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.