डाळिंब बागायतदारांवर ‘संक्रांत’

By admin | Published: December 7, 2015 11:48 PM2015-12-07T23:48:40+5:302015-12-08T00:44:47+5:30

बाजारात कवडीमोल किंमत : चेन्नईतील पावसाचा मोठा फटका

Pomegranate farmers' 'sankrant' | डाळिंब बागायतदारांवर ‘संक्रांत’

डाळिंब बागायतदारांवर ‘संक्रांत’

Next

गजानन पाटील -- संख--तमिळनाडू राज्यात झालेला मुसळधार अवकाळी पाऊस, उत्पादनातील वाढ यामुळे बाजारपेठेमध्ये डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. गंभीर दुष्काळी परिस्थिती, बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, तीव्र पाणीटंचाई या प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या बागांतून डाळिंब विक्रीची सुरुवात झालेली असताना, दर कमी झालेला आहे. बागांसाठी महागडी औषधे, रासायनिक खते, तसेच शेणखताचा लागवडीसाठी उपयोग करून, मशागतीचा भरमसाट खर्च करून आणि अनेक अडचणींवर मात करून पिकविलेली डाळिंबे कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५८ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहापुरती खरीप व रब्बी हंगामातील पिके घेऊन विहीर व कूपनलिकेमध्ये असलेल्या पाणीसाठ्यावर द्राक्षे, डाळिंब फळबागा लावल्या आहेत. द्राक्षबागेपेक्षा कमी खर्च येत असल्यामुळे शेतकरी डाळिंबाकडे वळला आहे. शंभर टक्के फळबाग अनुदान योजनेतून, ठिंबक सिंचन, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, आरक्ता, भगवा जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये ते उत्पादन घेत असल्यामुळे या शेतकऱ्यांनी बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला झाला आहे.
जून, जुलैमध्ये धरलेल्या बागांची डाळिंबे विक्रीयोग्य होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजारपेठेत दर कमी झाले आहेत. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये भगवा केशर जातीच्या डाळिंबांचा सरासरी ९० ते १२० रुपये किलो दर होता. आॅक्टोबर महिन्यामध्ये भगवा जातीच्या डाळिंबांचा सरासरी १३० रुपये किलोपर्यंत दर गेला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दरात चढ-उतार सुरू आहे.
चन्नई, हैदराबाद, बेंगलोर, नागपूर, दिल्ली, लखनौ या बाजारपेठांमध्ये दलाल, व्यापारी व फळबाग खरेदी-विक्री संघामार्फत माल पाठविला जातो. पण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डाळिंबाची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या चन्नईत अवकाळी पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डाळिंबाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून गणेश डाळिंबाचा दर ३० ते ३५ रुपये किलो दर झाला आहे. केशर डाळिंबाचा दर ४५ ते ५५ रुपये किलो झाला आहे. सोलापूर, सांगोला, आटपाडी, सांगली, बाजार समितीच्या सौदे बाजारात क्वचितच गणेश डाळिंबाला ३२ रुपये, केशरला ४५ रुपये दर मिळतो. सध्या गणेश ३० रुपये, केशर ४२ रुपये, भगवा ४० रुपये असा सरासरी दर मिळत आहे.
जूनमध्ये हंगाम धरलेल्या बागांची डाळिंब विक्री सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे दर नसल्याने शेतकऱ्यांनी फळांची तोडणी लांबवली आहे. पण येत्या १५ ते २० दिवसांत दर न वाढल्यास शेतकऱ्यांना मिळेल त्या भागात डाळिंब विक्री करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.


व्यथा शेतकऱ्यांच्या...
कष्टाने डाळिंब बागा वाढवल्या. महागडी औषधे, खते व मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर्जेदार उत्पादन करूनही अवकाळीने दर कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
- आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची

डाळिंबाची मोठी बाजारपेठ चेन्नई आहे. तेथे पाऊस असल्याने बाजारात आवक कमी असल्याने दर कमी झाला आहे. थोड्या दिवसांनी दरात वाढ होईल, अशी आशा वाटते.
- चिदानंद कोळी, डाळिंब व्यापारी

प्रश्न सध्याच्या दराचा
डाळिंब जातआॅक्टो.-नोव्हेंबरचा दरसध्याचा दर
गणेश४५ ते ५२ रुपये२५ ते ३२ रुपये
केशर ९० ते ११० ४५ ते ५०
भगवा १०० ते १३०५० ते ५५

कर्जाची परतफेड कशी होणार
शेतकऱ्यांनी बागांवर सोसायटी, बॅँक, खासगी सावकाराचे कर्ज काढलेले आहे. पण दर कमी झाल्याने त्याची परतफेड कशी होणार? हा प्रश्न डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.

Web Title: Pomegranate farmers' 'sankrant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.