काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:03+5:302021-02-18T04:50:03+5:30
सांगली : महापालिकेच्या सत्तेपासून अडीच वर्षे दूर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला महापौरपदाची खुर्ची खुणावू लागली आहे. भाजपमधील नाराजांंच्या जिवावर सत्तेची स्वप्ने ...
सांगली : महापालिकेच्या सत्तेपासून अडीच वर्षे दूर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला महापौरपदाची खुर्ची खुणावू लागली आहे. भाजपमधील नाराजांंच्या जिवावर सत्तेची स्वप्ने पडू लागल्याने महापौरपदाची निवडणूक कोणी लढवायची, असा वाद आघाडीत निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्यावर निर्णय झाला नाही. काँग्रेसने मात्र महापौरपदाच्या उमेदवारीसाठी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचे नाव निश्चित केले आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला.
महापौर पदासाठी सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून नगरसेवक निरंजन आवटी व धीरज सूर्यवंशी यांची, तर काँग्रेसकडून उत्तम साखळकर व राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान यांची नावे चर्चेत आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी उफाळून आल्याने काँग्रेस आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने महापौरपदाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात इच्छुकांकडून बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ कसे जमविणार, याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादीत बुधवारी रात्री उशिरापर्यंत महापौरपद कोण लढवणार, यावर खल सुरू होता. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यात स्पर्धा होती. मात्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महापौरपद आपल्यालाच हवे, अशी भूमिका घेतली. तसा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आला. काँग्रेसकडून महापौर पदाचे उमेदवार म्हणून उत्तम साखळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला तसे कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती. राष्ट्रवादीने मात्र गुरुवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय देणार असल्याचे काँग्रेसला सांगितले. त्यामुळे महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवारीचा घोळ बुधवारी रात्रीपर्यंत सुरूच होता. गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना सहलीवर नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चौकट
जयंत पाटील, कदम यांच्या निर्णयाकडे लक्ष
महापौर निवडीबाबत पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्यात गुरुवारी सकाळी मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवले जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुक गॅसवर आहेत. दोन्ही काँग्रेसमधील महापौरपदाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने नेत्यांचीही कोंडी झाली आहे.