शेतकरी कुटुंबातील मुलगी राज्यात प्रथम, सांगलीतील बोरगावच्या पूजा वंजारीची यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 05:55 PM2024-01-20T17:55:39+5:302024-01-20T17:55:52+5:30
सध्या सहायक निबंधक म्हणून कार्यरत
युनूस शेख
इस्लामपूर : काळ्या आईची सेवा करताना संघर्ष आणि अडचणींना तोंड देत कष्टाची पूजा मांडणाऱ्या बोरगाव (ता. वाळवा) येथील वंजारी कुटुंबातील पूजाने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमधून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. सध्या सहायक निबंधक म्हणून काम करणारी पूजा आता उपजिल्हाधिकारी म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारेल.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ या संत तुकारामांच्या पंक्तींनाच आपल्या जीवनाचे सार बनवून शेतकरी कुटुंबाच्या शिरपेचात ज्ञान पांडित्याचा तुरा रोवण्याचा विक्रम पूजा अरुण वंजारी हिने करून दाखविला आहे.
पूजाचे प्राथमिक शिक्षण प्रकाश पाटील विद्यामंदिरात व माध्यमिक शिक्षण मोहनराव पतंगराव पाटील विद्यालय असे बोरगावमध्येच झाले. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने २०१४ साली कंम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे वास्तव्य केले. वडील अरुण वंजारी शेती करतात, आई गृहिणी आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीनंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात सहायक निबंधक सहकारी संस्था या पदावर बाजी मारली होती. यादरम्यान पूजाचे लग्नही झाले; मात्र तरीही तिने उच्च अधिकारी बनण्याचा ध्यास सोडला नाही. पुढे उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सर्वप्रथम येत आपली ही इच्छासुद्धा पूजाने आपल्या अफाट कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या बळावर पूर्ण केली. त्यांच्या या यशदायी वाटचालीत आई-वडिलांसह शेती करणारे चुलते भरत, बांधकाम व्यावसायिक बाबासाहेब आणि कुमार वंजारी यांचे प्रोत्साहन लाभले.
अधिकाऱ्यांचे कुटुंब..
शिक्षणाचा ध्यास घेतला की, जीवनाचा कसा कायापालट होतो, हे बोरगावमधील वंजारी कुटुंबाने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे. पूजा वंजारी उपजिल्हाधिकारी बनेल. बहीण प्राजक्ता ही सध्या मुख्याधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहे. तर भाऊ रणजित भरत वंजारी हा पुणे येथेच जलसंपदा विभागात सहायक अभियंता म्हणून सेवेत आहे.