इस्लामपूरच्या उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:07 AM2021-01-13T05:07:14+5:302021-01-13T05:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील शिराळा नाका ते विशालनगर दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सत्ताधारी विकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील शिराळा नाका ते विशालनगर दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीच्या राजकीय श्रेयवादात सापडला आहे. त्यामुळे येथील नागरिकांतून दोन्ही गटाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत या प्रभागातून सत्ताधारी राष्ट्रवादीतून बशीर मुल्ला आणि प्रा. सविता आवटे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात विकास आघाडीतून सत्यवान रासकर, आशा पवार यांना उमेदवारी होती. नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता आली. परंतु रासकर आणि पवार यांचा पराभव झाला. पालिकेत सत्ता नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विशालनगरमधील रस्त्याची डागडुजी करता आली नाही, तर या भागात आपले नगरसेवक नसल्याने विकास आघाडीने लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील नागरिक दोन्ही गटांवर नाराज आहेत. येथील तयार असलेला बगीचा नियोजनाअभावी गेल्या चार वर्षांपासून कुलूपबंद आहे. विशालनगर आणि शिराळा नाका परिसरातील मुस्लीम समाजाची दफनभूमी शिवनगर भागात येते. या परिसरातील सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांनी स्वत:च्या प्रभागातील रस्ते चकाचक केले आहेत, तर विरोधी राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी पालिकेकडे दुर्लक्ष केले आहे. विद्यमान नगरसेवक बशीर मुल्ला आणि सविता आवटे प्रभागात संपर्क ठेवत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सत्ताधारी विकास आघाडीकडून विशालनगर दुर्लक्षित झाले आहे. येथील नागरिकांनी दोन्ही गटांना निवेदन दिले आहे. गेल्या चार वर्षांत विशालनगरमधील सुविधांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
फाेटाे : नगरपालिका लोगो