पोपटराव पवार यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार
By admin | Published: January 10, 2017 11:22 PM2017-01-10T23:22:04+5:302017-01-10T23:22:04+5:30
पोपटराव पवार यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार
सांगली : येथील शांतिनिकेतनमधील प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने दिला जाणारा ‘कर्मयोगी पुरस्कार’ यंदा हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथील आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना जाहीर झाला. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, रविवारी (दि. १५) शांतिनिकेतन परिसरात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे, अशी माहिती सोशल फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
थोरात म्हणाले की, समाज परिवर्तनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यंदा जलसंधारण आणि ग्रामस्वराज्य क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना गौरविण्यात येणार आहे. पावसाचे पाणी आणि उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पवार यांनी गाव हिरवेगार केले आहे. ऊस आणि केळी यासारखी पिके बंद करण्याचे धाडसही तेथील गावकऱ्यांनी दाखविले आहे. त्याऐवजी फूल शेती आणि भाजीपाला पिके घेण्याबाबत पवार यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. परिणामी गावातील दरडोई उत्पन्न ८३२ रुपयांवरून ३२ हजार रुपयांवर पोहोचले आहे. गावाचे आर्थिक उत्पन्न सुधारलेच, त्याचबरोबर दुष्काळातूनही सुटका मिळाली. निरक्षरता, जंगलतोड, व्यसनाधीनता, अस्वच्छता, दारिद्र्य, लिंगभेद, प्रदूषण या प्रश्नांवरही गावामध्ये जनजागृती झाली आहे. पवार यांच्या कार्याची आणि हिवरे बाजारची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली आहे. स्टॉकहोम येथील विद्यापीठात आणि ब्रिटिश लायब्ररीमध्ये हिवरे बाजारची यशोगाथा दाखवली जाते. यापूर्वी विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
दि. १५ जानेवारीला शांतिनिकेतन येथे जिल्हाधिकारी श्ेखर गायकवाड यांच्याहस्ते आणि ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात ‘माई’ पुरस्काराने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका समिता गौतम पाटील आणि कलाविश्व महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल व माई भोजनालयाचे व्यवस्थापक भीमराव पाटील यांचाही गौरव करण्यात येणार आहे.