वाळवा तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर चोवीसवरून १४.९४ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:09+5:302021-05-25T04:31:09+5:30
इस्लामपूर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर २४ टक्के होता. मात्र, लॉकडाऊन आणि इतर आरोग्यविषयक उपाययोजना केल्याने हा ...
इस्लामपूर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर २४ टक्के होता. मात्र, लॉकडाऊन आणि इतर आरोग्यविषयक उपाययोजना केल्याने हा दर आता १४.९४ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी समाधान व्यक्त केले.
इस्लामपूर तहसील कार्यालयात पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत कोरोना संसर्गाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली.
वाळवा तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतल्यावर पाटील यांनी समाधान व्यक्त करीत ही आढावा बैठक संपविली. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत स्तरावर विलगीकरण कक्ष करून कंटेन्मेंट झोन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना चाचण्या, सक्तीने विलगीकरण कक्ष केल्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. बनेवाडी, शिवपुरी, येवलेवाडी, भाटवाडी, खरातवाडी, रोझावाडी आणि फारनेवाडी या सात गावांत दोन्ही लाटेत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. ११ गावांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. ८८ हजार २७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर १६ हजार ९७३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २९२३ व्यक्तींनी खासगी रुग्णालयात लस घेतली आहे.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, डॉ. नरसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी अरविंद माळी, डॉ. साकेत पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संजय कोरे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव उपस्थित होते.
चौकट
पंचवीस गावांमध्ये ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध
गटविकास अधिकारी शिंदे म्हणाले, तालुक्यात १५ ठिकाणी ११ हजार ७५४ आरटीपीसीआर आणि २० हजार ८६६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या ६६ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून, २५ गावांमध्ये ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध आहेत. वाळवा, कामेरी आणि येडेनिपाणी या गावांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे.