महापालिका पोटनिवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 12:09 PM2022-01-04T12:09:57+5:302022-01-04T12:10:31+5:30
महाआघाडीत फूट पडली असून भाजपने पोटनिवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ अ मधील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी १२ जणांनी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडीसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. महाआघाडीत फूट पडली असून भाजपने पोटनिवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
काँग्रेसचे माजी महापौर हारूण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिकलगार हे ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. डिसेंबर महिन्यात ओबीसी आरक्षणानुसार कार्यक्रम जाहीर झाला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने खुल्या पद्धतीने निवडणुकीची घोषणा करताच इच्छुकांची संख्या वाढली होती.
काँग्रेसने हारूण शिकलगार यांचे चिरंजीव तौफिक यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे सुरेश सावंत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजपच्यावतीने अमोल गवळी यांनी अर्ज भरला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून उमर गवंडी, वंचित आघाडीतून उमरफारुख ककमरी, तर रणजित जाधव यांनी अपक्ष व शिवसेना, संदीप पाटील यांनी राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अमित पवार, समीर सय्यद, नईम शेख (शिवसेना), इरफान शिकलगार यांनी अर्ज भरला आहे.
ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी गतवेळी काँग्रेसकडून प्रयत्न झाले होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांची भेट घेतली होती. तेव्हा सर्वच राजकीय पक्ष सकारात्मक होते. पण आता ही जागा खुल्या गटासाठी राखीव झाल्याने चुरस वाढली आहे. त्यात महाआघाडीतील तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्याने भाजपने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते अजूनही बिनविरोधबाबत आशावादी असले तरी ही शक्यता मावळत चालली आहे.
महाआघाडीतील पक्षच पोटनिवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे भाजपने ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षपातळीवर बिनविरोधबाबत कसलीही चर्चा नाही. उलट वरिष्ठांनी निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. - दीपक शिंदे म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष भाजप.
राष्ट्रवादीच्या माघारीबाबत पालकमंत्री जयंत पाटील, संजय बजाज यांच्याशी चर्चा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही जयंतरावांशी बोलणे झाले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांशी राज्यमंत्री विश्वजित कदम चर्चा करणार आहेत. भाजपच्या चर्चेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरुच राहतील. - पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस