पोस्ट कोविड व्याधींवर डॉक्टरांविना होताहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:40+5:302021-07-22T04:17:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनातून बरे झालेल्या लोकांमधील गाफीलपणा त्यांच्यासाठी नव्या अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. कोरोनानंतरही काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनातून बरे झालेल्या लोकांमधील गाफीलपणा त्यांच्यासाठी नव्या अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. कोरोनानंतरही काही महिने विविध पोस्ट कोविड आजारांचा सामना करावा लागत असल्याने अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करत डॉक्टरांविना केवळ दुकानातील औषधांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे या लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपचार करु नयेत, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणेने केले आहे.
कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात, केअर सेंटरमध्ये किंवा गृह अलगीकरणात राहिलेल्या अनेकांना त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काही दिवसांनी काही आजारांचा सामना करावा लागतो. हे आजार किरकोळ असल्याचा विचार करुन त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. मात्र, वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार केल्यास त्यातून बाहेर पडता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यात अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करुन डॉक्टरांशिवाय स्वत: उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावरही बेफिकीरपणे सुरु आहे.
चौकट
काय असू शकतात लक्षणे
कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना कोरडा खोकला, अंगदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, शरिराच्या विशिष्ट भागाला सूज येणे यासारखे आजार होऊ शकतात. बऱ्याचदा डायरिया (अतिसार), बद्धकोष्ठता याप्रकारचे पोस्ट कोविड आजारही रुग्णांमध्ये दिसत आहेत.
चौकट
काय करायला हवे
कोरोनातून बरे झाल्यानंतर स्वत:च्या शरिरावर लक्ष ठेवा.
कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यावर स्वत:हून औषधे घेऊ नका.
लक्षणे किरकोळ वाटत असली तरी डॉक्टरांचा त्याबाबत सल्ला व उपचार घ्या.
कोरोनानंतरही अशक्तपणा किंवा अन्य आजार झाला म्हणून चिंता करु नये.
मानसिक स्वास्थ्य सकारात्मक ठेवून आजाराशी वैद्यकीय सल्ल्यानुसार लढा.
हलका व्यायाम करावा, पाैष्टिक आहार घ्यावा.
सार्वजनिक ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतर बेफिकिरी करु नये.
कोरोनातून बरे झाल्यानंतरही मास्कचा वापर करावा.
पुरेशी झोप व आराम करावा.
दारु व अन्य व्यसनांपासून दूर राहावे.
कोट
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवायला हवे. स्वत:हून औषधे घेऊन त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आजाराचा, व्याधीचा सामना करावा लागेल. पुन्हा कोरोना होणार नाही, ही मानसिकता अजिबात बाळगू नये.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली