पुलाला नव्हे शहराच्या विकासाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:23+5:302021-03-23T04:28:23+5:30
सांगली : आयर्विन पुलाला समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापाऱ्यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच ...
सांगली : आयर्विन पुलाला समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापाऱ्यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, वास्तविक आयर्विन पुलाला त्याच्या जवळच पर्यायी पूल हा खूप आधीच व्हायला हवा होता; परंतु दुर्दैवाने आधीच्या आघाडी सरकारमधील स्थानिक नेत्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले नाहीत. भाजप सरकार असताना मी एक आमदार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक पिढीजात व्यापारी म्हणून सांगलीच्या बाजारपेठेचा विकास, सांगलीतील वाढलेली वाहतूक या गोष्टी लक्षात घेऊन आयर्विन पुलाला एक समांतर पूल आणि हरिपूर कोथळी पूल असे दोन पूल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंजूर करून घेतले.
हरिपूर-कोथळी पूल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे; परंतु मेनरोडवरून होणारा पूल काही लोकांच्या राजकारणामुळे होऊ शकला नाही. गेले महिनाभर आयर्विन पूल हा दुरुस्तीसाठी जेव्हा पूर्ण बंद झाला त्यावेळी लाखो सांगलीकर आणि बाहेरील नागरिकांना समांतर पुलाची गरज लक्षात आली.
नवीन पुलावरून येणारी मोठी वाहने ही गणपती पेठमार्गे किंवा हरभट रोडवरून जातील, त्यामुळे मेनरोडवर वाहतुकीचा ताण येणार नाही. जवळपास पूर्ण मेनरोड हा ६० फूट आहेच. काही भागच न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने तो भाग अजून रुंद झाला नाही. न्यायालयाचा निर्णय झाल्यावरच तेथील रुंदीकरणाचा निर्णय होईल. त्याचा पुलाशी काही संबंध नाही. व्यापाऱ्यांना मी विश्वासात घेत नाही, असे धादांत खोटे विधान काही व्यापारी नेते करत आहेत. मी सदैव लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतो.
चौकट
जयंत पाटील यांच्याकडून अपेक्षा
पालकमंत्री जयंत पाटीलसुद्धा एक पालक या नात्याने यात राजकारण आणणार नाहीत याची मला खात्री आहे. गेल्या सात वर्षात प्रत्येक गावात, प्रत्येक प्रभागात मी कामे केली आहेत आणि पुढेही करणार आहे, असे गाडगीळ यांनी म्हटले आहे.