सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:07 PM2021-12-07T17:07:37+5:302021-12-07T17:10:52+5:30
सांगली : सांगली महापालिकेच्या प्रभाग सोळामधील पोट निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी स्थगित केली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती ...
सांगली : सांगली महापालिकेच्या प्रभाग सोळामधील पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी स्थगित केली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीसाठी सोमवारी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या निर्णयामुळे उमेदवारांच्या तयारीवर पाणी फिरले आहे.
काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. शिकलगार हे प्रभाग सोळामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आले होते. या पोटनिवडणुकीसाठी तौफिक शिकलगार (काँग्रेस), अमोल गवळी(भाजप), उमर गवंडी (राष्ट्रवादी), याकूब बागवान (वंचित आघाडी) यासह ८ जणांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी सकाळी अर्जाची छाननी पूर्ण झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यात दुपारी राज्य निवडणूक आयोगाने स्थगितीचे आदेश दिले.
आदेशात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गातील जागांच्या निवडणुका स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याला अनुसरून महापालिकेची प्रभाग १६ मधील पोटनिवडणूक सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही करून तात्काळ अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. निवडणुकीबाबत पुढील प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा नुसार होईल, असेही स्पष्ट केले आहे.