जिल्ह्यातील तलाठी निवड यादीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:57+5:302021-06-05T04:20:57+5:30
सांगली : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या तलाठी भरतीप्रक्रियेतील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात खुल्या प्रवर्गातील महिला गटातील उमेदवारांच्या तक्रारीनंतर ...
सांगली : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या तलाठी भरतीप्रक्रियेतील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात खुल्या प्रवर्गातील महिला गटातील उमेदवारांच्या तक्रारीनंतर यादीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थगिती दिली आहे. आता खुल्या प्रवर्गातील तिसऱ्या क्रमांकावरील महिला उमेदवार व एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सोमवार, दि.७ रोजी या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे.
सन २०१९ मध्ये तलाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याची प्रक्रिया पूर्ण करत अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, दोन महिला उमेदवारांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. एसईबीसी या प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आल्याने त्यांना खुल्या प्रवर्गात पात्र ठरविणे अपेक्षित असतानाही त्यांना डावलण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे दोन उमेदवारांच्या अर्जानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी खुल्या महिला तलाठी निवड यादीसह प्रतीक्षा यादीलाही स्थगिती दिली आहे.
मराठा आरक्षणास स्थगिती देण्यात आल्यानंतर नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर दोन महिला उमेदवारांनी पाठपुरावा करत याबाबत तक्रार दाखल केली. यावेळी उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शासन निर्णयानुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करत निवड व प्रतीक्षा यादीला स्थगिती दिली आहे, तर त्यांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.
कोट
उमेदवारांच्या तक्रारीनुसार निवड यादीस स्थगिती देण्यात आली आहे. शासन निर्णयाच्या अधीन राहून हा निर्णय घेण्यात आला असून, आता त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी