कवठेमहांकाळमध्ये भ्रष्टाचार
By admin | Published: April 12, 2017 11:40 PM2017-04-12T23:40:41+5:302017-04-12T23:40:41+5:30
अजितराव घोरपडे : पाणलोट विकास कामांच्या चौकशीची मागणी
कवठेमहांकाळ : सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात व इतर योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून, याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासअंतर्गत केलेल्या कामांची माहिती द्यावी, अशी मागणी अजितराव घोरपडे यांच्यासह कुंडलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने कृषी अधिकारी अमृतसागर यांच्याकडे केली.
कवठेमहांकाळ तालुका कृषी कार्यालयातील एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड कुंडलापूर येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी अजितराव घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तालुका कृषी अधिकारी अमृतसागर यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी अजितराव घोरपडे यांच्यासमोर अधिकाऱ्यांवर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
शासनाने मोठा गाजावाजा करत एकात्मिक पाणलोट विकास अभियान हाती घेतले. या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा शासनाचा जरी प्रयत्न असला तरी शासनाने नियुक्त केलेलेच कर्मचारी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात मोठ्य प्रमाणात भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप कुंडलापूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे. येथील तालुका कृषी अधिकारी अमृतसागर केवळ नामधारी असून, कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील हेच कामकाज चालवितात की काय?, असा सवाल शेतकरी विचारत असून, त्यांच्या कामामुळे कृषी अधिकारी नामोहरम असल्याचे दिसून येत आहे.
या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता, थातूर-मातूर उत्तरे देण्यात आली असल्याने त्या गावात किमान ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची चर्चा आहे. या अपहारप्रकरणी लवकरच एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात शेततळी, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे आदी कामे झाली आहेत. कुंडलापूर येथे पंधरा हजार रुपयांची माहिती पुस्तके वितरित केली आहेत. मात्र प्रत्यक्षात गावात एकाही लाभार्थ्याला माहितीपुस्तके मिळाली नाहीत. तसेच अव्वाच्या सव्वा दराने सोलर खरेदी केले आहेत. जुन्याच बंधाऱ्यावर नवीन बंधारा बांधून बिले काढली आहेत. तसेच शेतीसाठी दिलेल्या अनुदानाचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप पोपट गिड्डे यांनी अमृतसागर यांच्याकडे केला. यावेळी तानाजी यमगर, सुनील पाटील, दादासाहेब कोळी, दिलीप झुरे, वैभव नरुटे उपस्थित होते. (वार्ताहर)