निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर

By admin | Published: March 2, 2017 11:48 PM2017-03-02T23:48:46+5:302017-03-02T23:48:46+5:30

जयंत पाटील : मिरजेत राष्ट्रवादीची चिंतन बैठक; जिल्ह्यातील पक्षीय पराभवाची नैतिक जबाबदारी माझीच

Power abuse by BJP in elections | निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर

निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर

Next



मिरज : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात भाजपने सत्तेचा वापर केला. प्रशासनाची यंत्रणाही त्यांना सामील झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचा अनपेक्षित पराभव झाल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी येथे राष्ट्रवादीच्या आत्मचिंतन बैठकीत केला. पराभवाची नैतिक जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी दिलेला राजीनामा आ. पाटील यांनी नाकारला.
मिरज तालुक्यात राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने त्याच्या कारणमीमांसेसाठी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी व पराभूत उमेदवारांनी स्वपक्षीय नेत्यांनी घात केला, आघाड्यांमुळे चिन्ह मिळाले नाही, पक्षाची यंत्रणा कमी पडली, बेडगमध्ये पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याचा परिणाम झाला, अशा तक्रारी केल्या.
आ. जयंत पाटील म्हणाले की, तासगाव, कवठेमहांकाळची जबाबदारी असल्याने मिरज तालुक्यास वेळ देऊ शकलो नाही. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी माझी आहे. जी मते मिळाली ती स्थानिक कार्यकर्त्यांमुळे मिळाली आहेत. बेडगमध्ये माघार घेण्याची घटना गंभीर आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराने पक्षासाठी लढणे आवश्यकच होते. जे कार्यकर्ते निवडून येतील अशी अपेक्षा होती, त्यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे.
मतदानापूर्वी दोन दिवस अगोदर भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा वापर केला. पैसे वाटप करताना आम्ही विरोधकांना पकडून दिले. मात्र प्रशासन यंत्रणाही भाजपला सामील होती. राष्ट्रवादी, काँग्रेस व विकास आघाडीला ६३ टक्के मते मिळाली आहेत. मात्र मत विभागणीमुळे केवळ ३४ टक्के मते मिळवून भाजप उमेदवार निवडून आले. यापुढे गटनिहाय बैठका घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करणार आहे. मिरज पूर्व भागातील गावांचा दौरा करून संस्थात्मक व रचनात्मक काम करणार आहे. पक्षाची यंत्रणा मिळाली नाही. या पराभूत उमेदवारांच्या तक्रारीबाबत हरिपूर, मालगाव व कवलापूर वगळता अन्य मतदार संघातील उमेदवारांचा संपर्क झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
खटाव येथे मोहनराव शिंदे कारखान्याच्या संचालकांनी पक्षाचे काम केले नसल्याची बैठकीत तक्रार करण्यात आली. मालगाव येथील पक्षाचे जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे निवडणुकीपूर्वीच मी तुला पाडणार, असे सांगत होते. माझ्यासाठी काढलेल्या खड्ड्यात ते स्वत:च पडल्याची तक्रार युवक तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली. मिरज पूर्व भागात आघाडीतून निवडणुका लढविल्याने चिन्हाची अडचण झाल्याची काही उमेदवारांनी तक्रार केली.
जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार देऊ शकलो नसल्याने त्यांची पक्षावर नाराजी असल्याचे सांगत पराभवाची जबाबदारी म्हणून बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा आ. पाटील यांच्याकडे दिला. आ. पाटील यांनी राजीनामा नाकारला. जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी, मिरज तालुक्यातील कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले.
बैठकीस अंकुश चव्हाण, श्रीकांत डोंगरे, शिवाजी माळी, चंद्रकांत माळी, वसंत खोत, आबासाहेब पाटील, अनिल शेगुणशे, प्रकाश क्षीरसागर, आनंदराव भोसले, जयंत नागरगोजे, परशुराम नागरगोजे, साहेबराव जगताप, भारत कुंडले, ओंकार शिंदे, उमेश पाटील, गंगाधर तोडकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Power abuse by BJP in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.