समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:06 AM2019-01-28T00:06:37+5:302019-01-28T00:06:42+5:30

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. ...

Power to connect community: Religious masters | समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

समाजाला जोडण्याची ताकद धर्मात: चारूकीर्ती स्वामी

Next

सांगली : समाजात मोठ्या वेगाने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीत धर्म कायम राहणे व त्याची वृध्दी होणे आवश्यक आहे. जनतेच्या हृदयातील धर्माचे संवर्धन करणे गरजेचे असून, मंदिरापेक्षाही लोकांच्या हृदयात त्याचे स्थान आहे. समाजात होत असलेली क्रांती पाहता, एकतेसाठी धर्म काम करतो. त्यामुळे समाजाला जोडण्याची ताकद धर्मात आहे, असे प्रतिपादन श्रवणबेळगोळ येथील जैन मठाचे प्रमुख स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या महास्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, विविध विषयांवर आपली मते नोंदवत, समाजाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.
ते म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या नवीन पिढी प्रगल्भ होत आहे. तरूणांमध्ये आस्तिकता वाढत आहे. धर्ममार्गात तेही येऊ शकतात. त्यामुळे या पिढीत धर्माप्रति रुची निर्माण करण्याची गरज आहे. परिवर्तनशील बनलेल्या समाजात निरंतर जागृतीची आवश्यकता आहे. संस्कृतीला सुरक्षित राखण्याचे काम सर्वच घटकांनी केले पाहिजे. समाजाला जोडण्याच्या भूमिकेत धर्म असतो, तर तोडणारा अधर्म असतो. नव्या समाजात शांतीची प्रत्येकाला गरज असल्याने, दोष सोडून सहनशीलतेमुळे परिवारात आनंद निर्माण होऊ शकतो. क्रियेला प्रतिक्रिया दिल्यानेच वादविवाद निर्माण होतात.
प्राकृत भाषेला सर्वजण विसरले होते. मात्र, याच भाषेत जैन समाजाचे सार असल्याने पुन्हा स्थापित करण्यात येत आहे. या विषयावर पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाहन वापरणे सोडले होते. भगवान महावीरांचे विचार यातून दिले आहेत. श्रवणबेळगोळ येथील हॉस्पिटल नसून त्याला आम्ही मंदिर म्हणतो. गेल्या २५ वर्षांपासून परिसरातील बेरोजगारी मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राकृत विश्वविद्यालयाची स्थापना करून प्राकृत, संस्कृत व पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सनतकुमार आरवाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Power to connect community: Religious masters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.