कार्यालयांची वीज तोडण्याचा सपाटा

By admin | Published: March 30, 2016 11:23 PM2016-03-30T23:23:51+5:302016-03-30T23:46:08+5:30

आटपाडी तालुक्यात थकित वीजबिल : नोटिसा देऊनही दुर्लक्ष केल्याने कंपनीची कारवाई

The power cuts of the offices | कार्यालयांची वीज तोडण्याचा सपाटा

कार्यालयांची वीज तोडण्याचा सपाटा

Next

आटपाडी : येथील बहुतांशी शासकीय कार्यालयांनी वीज वितरण कंपनीने अनेकवेळा नोटीस दिली, तरी न घाबरता अनेक महिन्यांपासून वीज बिलच भरलेले नाही. आता विजेची कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावल्याने त्यांच्यावर अंधारात बसण्याची वेळ आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाला विहिरीवरील पंपाची सोडून १ कोटी ७० लाख रुपये एवढी थकबाकी दि. ३१ मार्चपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १९१ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १८६ शाळांनी गेल्या वर्षभरात वारंवार नोटिसा पाठवूनही वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे या सर्व शाळांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. हे वीजबिल भरण्याची जबाबदारी काही विद्यार्थ्यांची नाही, पण आता सर्व शाळेतील ४७७१ विद्यार्थी आणि ४८५१ विद्यार्थिनी अशा एकूण ९६२२ विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या कालावधीत याचा फटका बसला आहे.
आटपाडी पंचायत समितीचा कारभार कायम टक्केवारीने वादग्रस्त ठरलेला असताना या तालुक्याच्या विकासाच्या कार्यालयाचे वारंवार विजेचे कनेक्शन तोडण्यात येते.
२४ जानेवारी रोजी ४१ हजार रुपये थकबाकीसाठी कनेक्शन तोडले होते. २६ जानेवारीच्या कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून त्यावेळी तातडीने २९ हजार भरले. बाकीचे नंतर भरतो म्हणून सांगितले. तेव्हा कनेक्शन जोडले. आता पुन्हा १९ हजार रुपये थकबाकीसाठी मंगळवार, दि. २९ रोजी कनेक्शन तोडले आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १९५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. यापूर्वी दि. ५ मे २०१५ रोजी २८ हजार ९२० रुपये वीज बिल भरले होते. त्यानंतर बिल भरलेच नाही. त्यांचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.
आटपाडीच्या तलाठी कार्यालयातील विजेचे दि. १५ डिसेंबर १५ नंतर वीजबिल भरलेले नाही. १३०० रुपये थकबाकी आहे. त्यासाठी कनेक्शन तोडले आहे.
नुकत्याच झालेल्या आम सभेत टेबलाखालून आणि वरुन बंडल घेतले जात असल्याच्या चर्चेने उजेडात आलेल्या येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या सात दिवसांपासून अंधार आहे. या कार्यालयाची ४३३० रुपये वीजबिल थकित आहे.
‘ट्रेझरी’चे कार्यालय १६८० रुपये थकबाकी असल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. स्वतंत्रपूर खुली वसाहतीच्या ‘रेस्ट हाऊस’चे वीजबिल दि. ११ मार्च २०१५ नंतर भरण्यात आलेले नाही. नोटिसा देऊनही वीजबिल न भरल्याने आता तेथील कनेक्शन तोडण्यात आले आहे.
आटपाडी पोलिस ठाण्याकडे १ लाख ९२ हजार ७१० रुपये थकबाकी आहे. दि. २५ मे २०१५ रोजी पोलिसांनी ४८८६४ रुपये वीजबिल भरले होते. गेल्या १० महिन्यांपासून त्यांचे वीजबिल थकित आहे. शासकीय कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

थकबाकीदार ‘थ्री स्टार’!
वीज वितरण कंपनीने थकबाकीदारांची श्रेणी केली आहे. थोडे दिवस थकबाकी ठेवणारे एक ‘स्टार’, नोटीस दिल्यावर लगेच थकबाकी भरणारे ‘दोन स्टार’ आणि नोटिसांना न जुमानता महिनो न् महिने थकबाकी न भरणारे ‘थ्री स्टार’ थकबाकीदार! तालुक्यात एकूण १५०० थकबाकीदार आहेत. त्यापैकी आटपाडीतील ८२७ ‘स्टार’ आहेत. त्यामध्ये गरीब परिस्थिती असलेले अत्यंत कमी आहेत.

Web Title: The power cuts of the offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.