कलेच्या छंदात आयुष्याला समृद्ध करण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:27+5:302021-03-17T04:27:27+5:30

मिरज : ज्याला कलेचे पंख नाहीत, त्याचे आयुष्य कलेवर होते. कलेच्या छंदात आयुष्य समृद्ध करण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन ...

The power to enrich life in the hobby of art | कलेच्या छंदात आयुष्याला समृद्ध करण्याचे सामर्थ्य

कलेच्या छंदात आयुष्याला समृद्ध करण्याचे सामर्थ्य

Next

मिरज : ज्याला कलेचे पंख नाहीत, त्याचे आयुष्य कलेवर होते. कलेच्या छंदात आयुष्य समृद्ध करण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक प्रवीण दवणे यांनी केले.

मिरजेत कन्या महाविद्यालयात मराठी व सांस्कृतिक विभागातर्फे ‘माझ्या कवितेची आनंदयात्रा’ या विषयावर दवणे यांचे व्याख्यान, तसेच मातोश्री पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक गोखले अध्यक्षस्थानी हाेते. यावेळी संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी स्वागत केले. ज्योती पांगळे हिने स्वागतगीत गायले. डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी परिचय करून दिला. दवणे यांनी ‘माझ्या कवितेची आनंदयात्रा’ सादर करीत उपस्थितांशी संवाद साधला. मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, बा. भ. बोरकर, इंदिरा संत यांच्या साहित्यामुळे मी घडलो. फक्त अर्थार्जन म्हणजे जगणं नसतं, तर चांगलं संगीत, कला, चित्र, शिल्प, काव्य, प्रवास यांची जोपासना करणं हे खरं जगणं आहे. लेखन व कवितांतून जगणं शिकून ही आनंदयात्रा घडवू शकलो, असेही ते म्हणाले.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कीर्ती महाजन यांना प्रवीण दवणे यांच्या हस्ते मातोश्री पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थिनी दत्तक योजनेतील विद्यार्थिनींना दवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, प्रवेश व बोर्ड फी व नवीन कपडे देण्यात आले. गुणवंत विद्यार्थिनींना रोख रक्कम देण्यात आली. महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. माधुरी देशमुख, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, प्रा. मानसी शिरगावकर, प्रा. सुवर्णा यमगर, प्रा. बी. आर. पवार, प्रा. पूनम होवाळ यांनी संयोजन केले. प्रा. पांडुरंग तपासे यांनी आभार मानले.

Web Title: The power to enrich life in the hobby of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.