साहित्यात आंतरिक परिवर्तनाची ताकद
By admin | Published: December 27, 2015 11:55 PM2015-12-27T23:55:54+5:302015-12-28T00:29:56+5:30
प्रदीप पाटील : बेळंकी येथे इरादा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास प्रतिसाद
सांगली : साहित्यातील ललितकलांचे माध्यम आणि साहित्याचे माध्यम यात फरक आहे. साहित्याचे माध्यम असणारी भाषा ही मुळात सामाजिक आहे. जगण्यातले अनुभव साहित्यिक सामर्थ्याने व्यक्त करतो. साहित्यातून व्यक्त होणारी भावना ही परिणामकारकपणे पोहोचत असल्याने साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असल्याने समाजासह प्रत्येकाच्या मनातील आंतरिक परिवर्तनाची खरी ताकद साहित्यातच असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी प्रदीप पाटील यांनी केले. बेळंकी (ता. मिरज) येथे आयोजित दुसऱ्या इरादा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात साहित्य चळवळ मूळ धरत आहे, ही साहित्याच्या आणि सुदृढ समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. साहित्य चळवळ राबविताना त्यात तरुणांचा वाढत असलेला सहभागही आशादायी असाच आहे. आजच्या तरुणांनी आपले विचार मांडताना साहित्याचा एक सशक्त माध्यम म्हणून वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रामीण साहित्य व ग्रामीण जीवन : काल आणि आज’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, खेड्यांची नागरिकीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज आहे. या संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने ग्रामीण भागातील समाज अधिक सुदृढ होण्यास मदत होणार आहे.
‘आजचा युवक आणि अध्यात्म’ या विषयावर बोलताना राजा माळगे म्हणाले, शास्त्र आणि विज्ञानाची तात्त्विक बैठक अध्यात्मात आहे. नाट्यलेखक इरफान मुजावर यांचे ‘माझ्या स्वप्नातला मी आणि वास्तव’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, सर्व काही असूनही मी अस्वस्थ का होतो?, या प्रश्नात आपली स्वप्ने दडलेली आहेत. सुरुवातीला आपण एका गोष्टीत गुंतत जात असताना, ज्यावेळी आपण त्यातून बाहेर येतो, त्यावेळी आपणच आपल्याला दोषी मानतो. ही अस्वस्थता महत्त्वाची आहे.
जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम हे ‘आजची तरुणाई किती आॅनलाईन, किती आॅफलाईन’ या विषयावर बोलताना म्हणाले, आॅफलाईन जगण्यातही आनंद आहे, तो शोधला पाहिजे. तारतम्याने आॅनलाईन जिंदगीतही संवेदनशीलता जपली पाहिजे.
कविसंमेलन दयासागर बन्ने व अन्य कवींच्या उपस्थितीत झाले, तर सायंकाळी आप्पासाहेब खोत यांचे विनोदी कथाकथन पार पडले.
यावेळी सरपंच पांडुरंग कोरे, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, खंडेराव जगताप, राजाराम गायकवाड, साहित्यिक मोहन पाटील, संतोष काळे, भीमराव पाटील, कवी नामदेव भोसले, चंद्रकांत बाबर, मनीषा पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
रवी कुंभार, नंदकुमार बिसुरे, तहसीलदार मदन जाधव, डॉ. मनोज पवार, अजित कुंडले यांच्यासह इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)
गावाप्रती स्नेह : ‘इरादा’च्या उपक्रमाचे कौतुक
इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे वैशिट्य म्हणजे बेळंकी आणि परिसरातील, मात्र नोकरीच्या निमित्ताने देशात आणि परदेशात असणाऱ्या तरुणांनी एकत्र येत केलेले नेटके संयोजन होय. गावात साहित्य चळवळ रुजावी, यासाठी ‘इरादा’च्या सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.