भाजपकडून सत्तेचा गैरवापर : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:34 PM2018-05-03T21:34:56+5:302018-05-03T21:34:56+5:30
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी भाजपचे नेते राज्यातील सत्तेचा गैरवापर करीत आहेत. या ठिकाणच्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत,
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी भाजपचे नेते राज्यातील सत्तेचा गैरवापर करीत आहेत. या ठिकाणच्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, महापालिकेचा निधी नियोजन समितीकडे वर्ग करणे, एलबीटीचे अनुदान उशिरा देणे, आयुक्त व तत्सम अधिकाऱ्यांना सरकारच्या इशाºयाप्रमाणे काम करण्यास भाग पाडणे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सत्तेच्या गैरवापरातून भाजपकडून केल्या जात आहेत. लोकशाहीला मारक असणाºया सर्व गोष्टींचा अंगीकार भाजपने केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक विकासकामांपासून वंचित राहून त्याचा फटका सत्तेवर असलेल्या पक्षाला व्हावा, असा त्यांचा उद्देश आहे. भाजपचा हा डाव आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. कॉँग्रेस अशा गोष्टींचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. राष्टÑवादीसोबत आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांच्या मतावर अवलंबून आहे. त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही आमचा फैसला जाहीर करू. त्यासाठी लवकरच स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते बैठक घेतील.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये भाजपच्या काळात ३८ टक्के वाढ झाल्याची माहिती एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)नेच दिली आहे.
शेतकरी, कामगार वर्गाचेही हाल सुरू आहेत.
मतपत्रिकांचा वापर करा
देशात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्राबाबत लोकांच्या मनात शंका आहे. वारंवारच्या संशयास्पद निकालांमुळे या चर्चेस बळ मिळत आहे. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.