आयर्विनच्या ठेकेदारांकडून वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:59+5:302021-02-27T04:35:59+5:30
सांगली : येथील कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी या ठेकेदाराने महापालिकेच्या स्ट्रीट लाईट कनेक्शनमधून ...
सांगली : येथील कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी या ठेकेदाराने महापालिकेच्या स्ट्रीट लाईट कनेक्शनमधून वीजचोरी करत दुरुस्तीचे काम सुरू केले होते. हा प्रकार स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील यांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याची मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयर्विन पुलाच्या फुटपाथची बाजू खचल्याने सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पुण्यातील एका कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. एक महिना हे काम सुरू राहणार आहे. कंत्राटदाराने गेल्या तीन दिवसांपासून काम सुरू केले आहे. मात्र, या कामासाठी लागणारी वीज ही महापालिका विद्युत विभागाची पूर्वपरवानगी न घेता थेट पथदिव्यांच्या खांबावरून चोरून घेतली आहे. यासाठी पुलावर असणाऱ्या विद्युत पेटीतील मीटरमध्ये छेडछाड करून कनेक्शन घेण्यात घेऊन काम सुरू केले आहे. नगरसेवक अजिंक्य पाटील यांनी हा वीजचोरीचा प्रकार समोर आणला.
अजिंक्य पाटील यांनी ठेकेदाराला धारेवर धरत महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बाब निदर्शनास आणून दिली. याप्रकरणी पाटील यांनी महापालिकेचे विद्युत अभियंता अमर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता ठेकेदाराने कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी विजेची चोरी करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, वीजचोरीचा भुर्दंड हा महापालिकेला बसणार असल्याने तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.