प्राची पाटीलला केंब्रिज विद्यापीठात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:34+5:302021-08-21T04:30:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : अंत्री बुद्रूक (ता. शिराळा) येथील प्राची सुहास पाटील या महाराष्ट्रीयन कन्येने अटकेपार मराठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : अंत्री बुद्रूक (ता. शिराळा) येथील प्राची सुहास पाटील या महाराष्ट्रीयन कन्येने अटकेपार मराठी झेंडा फडकविला आहे. तिने मेहनतीच्या जोरावर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात एमबीबीएस (मेडिसिन)ला प्रवेश मिळवीत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अभूतपूर्व यश मिळवून प्राची पाटीलने मुलीसुद्धा सक्षम, आत्मनिर्भरपणे भरारी घेऊ शकतात हे सिद्ध करून दाखविले आहे. तिचे आजोळ शिरगाव (ता. वाळवा) आहे. ती सध्या कुटुंबियांसमवेत इंग्लंडमध्येच स्थायिक आहे. प्राचीचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर आई शिक्षिका. घरी शिक्षणाचा वारसा असल्याने प्राची लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. सातवीमध्ये असताना तिने रँक मिळविली होती. इंग्लंड येथील नामांकित शाळेत तिचे शिक्षण झाले. आता तिने केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. या यशाबद्दल अंत्री बुद्रुक येथील नाथा पाटील कुटुंबीय, शिरगाव येथील नातेवाईक व परिवाराकडून तिचे अभिनंदन होत आहे.