प्राजक्ता कोरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:40+5:302021-07-21T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांना आरोग्यसेवा लिडरशीप पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल भगतसिंह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांना आरोग्यसेवा लिडरशीप पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ३१ जुलै रोजी तो मुंबईत राजभवनामध्ये प्रदान केला जाईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रमुख पाहुणे आहेत. पालकमंत्री अस्लम शेख या वेळी उपस्थित राहतील.
गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात कोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा या नात्याने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. कोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेशा सुविधा देऊन आरोग्यदृष्ट्या ती सुसज्ज केली. सुमारे ३५ हून अधिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका दिल्या. वाळवा, कडेगाव, मिरज तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याच्या काळात प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविल्या. गावोगावी घरगुती विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण कक्षाची सक्ती केली, त्यामुळे अनेक गावांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली.
खुद्द जिल्हा परिषदेतही विविध विभागांत कोरोनाबाधित वाढत असल्याच्या काळात उपाययोजना केल्या. नियंत्रण कक्षाद्वारे बेडचे नियोजन केले. याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.