प्रकाश हाॅस्पिटलने कोराना लढाईत रुग्णांना आधार दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:41+5:302020-12-29T04:26:41+5:30
इस्लामपूर : सध्या राजकारणातील विचारसरणी बदलत चालली असून शिक्षण, आरोग्य यासारख्या पवित्र क्षेत्रातही राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या आहेत, हे ...
इस्लामपूर : सध्या राजकारणातील विचारसरणी बदलत चालली असून शिक्षण, आरोग्य यासारख्या पवित्र क्षेत्रातही राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या आहेत, हे दुर्दैवी आहे. शिक्षणाने आजची तरुण पिढी ज्ञानी बनत आहे, तर चांगल्या आरोग्य सेवेने रुग्ण व नातेवाईकांना आधार मिळत आहे. कोरोना लढाईत प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने चांगली सेवा देऊन अनेकांच्या दु:खावर फुंकर घालून रुग्ण व नातेवाईकांना आधार व विश्वास दिला, असे मत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
हैदराबादच्या भारत बायोटेकने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असून त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी देशातील २६ रुग्णालयांची निवड केली आहे. यामध्ये इस्लामपूर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरची निवड झाली आहे. रविवारी प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रारंभ नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलाचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात अविरतपणे काम सुरु आहे. ही वाटचाल करत असताना हजारो गोरगरीब व सर्व स्तरातील रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. कोरोना लढाईत तर देशसेवा व कर्तव्य समजून हाॅस्पिटलमधील डाॅक्टर्स, नर्सेस व सहकारी स्टाफने काम केले, मात्र हीच आरोग्यसेवा अनेकांच्या पचनी पडली नाही, म्हणूनच महात्मा फुले जननी आरोग्य योजना बंद करुन सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना लाभापासून वंचित ठेवण्यात धन्यता मानणारे विरोधक आहेत. मात्र वाळवा, शिराळा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील एकही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्ही घेत आहोत.
मेडिकल डायरेक्टर डाॅ. विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, प्रसाद पाटील, विकास पाटील, मधुकर हुबाले, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, चंद्रकांत पाटील, संजय हवलदार उपस्थित होते. डाॅ. अभिमन्यू पाटील यांनी आभार मानले.
फोटो : २७ इस्लामपुर १