प्रकाश शेंडगे म्हणतात, आरेवाडीतील दसरा मेळाव्याला हार्दिक पटेलला निमंत्रण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:52 PM2018-10-01T23:52:46+5:302018-10-01T23:52:56+5:30
सांगली : आरेवाडी येथील दसरा मेळाव्यासाठी आम्ही गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. ट्रस्टींच्या निर्णयाप्रमाणे याठिकाणचा धनगर समाजाचा मेळावा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेंडगे यांच्यासोबत यावेळी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बिरू कोळेकर, दाजी कोळेकर, सचिन कोळेकर आदी पदाधिकारी तसेच देवस्थानचे पुजारी रघू कोळेकर उपस्थित होते. शेंडगे म्हणाले की, आरक्षणासह समाजाच्या सर्व प्रमुख मागण्यांसाठी यावेळचा दसरा मेळावा निर्णायक स्वरुपाचा असेल. या मेळाव्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील कोणत्याही नेत्यास डावलले नाही. गोपीचंद पडळकरसुद्धा मेळाव्यात येऊन समाजाला मार्गदर्शन करतील, अशी आमची खात्री आहे. समाजाच्या प्रश्नासाठी आम्ही एक आहोत, असा संदेशही आम्ही देणार आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम देण्यात येईल. सरकारने जर आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही, तर भविष्यातील आंदोलनाची दिशा काय राहील, याविषयीची चर्चाही मेळाव्यात करण्यात येणार आहे. सरकारबद्दल आमची नाराजी आहे. सरकारने गेल्या चार वर्षात आरक्षणाचा प्रश्न सोडविलेला नाही. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. कोणत्याही सरकारच्या काळात आजवर समाजाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे क्रांतिकारी पाऊल टाकण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. हार्दिक पटेलना आम्ही निमंत्रण दिलेले नाही. त्याबाबतचा ट्रस्टींनी कोणताही निर्णय घेतला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवस्थानचे पुजारी कोळेकर म्हणाले की, आरेवाडीतील मेळाव्याच्या नियोजनासाठी ग्रामसभेत चर्चा झाली. त्यावेळी अध्यक्ष अनुपस्थित राहिल्यामुळे उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे त्यादिवशी जे नियोजन झाले आहे, त्याप्रमाणेच मेळावा होईल. हार्दिक पटेल यांना निमंत्रण देण्याचा विषय चर्चेला आला नाही.
पक्ष नव्हे, जनतेचा निर्णय मान्य : शेंडगे
जत विधानसभा मतदारसंघाची जागा कॉँग्रेसकडे घेऊन याठिकाणी विक्रम सावंत यांना उमेदवारी देण्याबाबतची घोषणा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याबाबत शेंडगे म्हणाले की, पक्षाच्या निर्णयापेक्षा जनतेचा निर्णय महत्त्वाचा असतो. याठिकाणी लवकरच जनता उमेदवारीबद्दल निर्णय घेईल. त्या निर्णयाचा पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही. माझा निर्णय हा जनतेच्या मतावर अवलंबून असेल. पक्षाच्या निर्णयाशी जनतेचा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.
मतभेद उजेडात
आरेवाडी देवस्थान ट्रस्टमध्येच मतभेद असल्याची बाब सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट झाली. ट्रस्टचे अध्यक्ष यावेळी गैरहजर होते. अध्यक्ष पडकरांसोबत आणि उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी शेंडगेंसोबत असल्याचे दिसून आले.