Sangli: एमपीएससीत सलग दोनवेळा पहिला आला, गावकऱ्यांनी हत्तीवरुन मिरवणूक काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:10 PM2023-04-19T12:10:44+5:302023-04-19T12:11:01+5:30
सोनी गावचा राज्यात लौकिक करणाऱ्या प्रमोद चाैगुले यांची सोनी ता. मिरज येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली
मिरज : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवून सोनी गावचा राज्यात लौकिक करणाऱ्या प्रमोद चाैगुले यांची सोनी ता. मिरज येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून ग्रामस्थांनी गावात मिरवणुकीचे आयोजन केले.
सोनी गावचे सुपुत्र प्रमोद चौगुले यांनी सलग दोन वेळा स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवत इतिहास रचला. यामुळे सोनी गावाचाही राज्यात लौकिक झाला. चौगुले यांनी पहिल्यांदा राज्यात पहिला क्रमांक मिळविला त्यावेळीही त्यांची गावात सवाद्य मिरवणूक काढून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. आता सलग दुसऱ्यांदा राज्यसेवा आयोगात प्रथम क्रमांक पटकावल्याने गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.
दिनकर पाटील युथ फाउंडेशनच्या पुढाकाराने मिरवणुकीसाठी हत्ती आणला. प्रमोद चौगुले यांना हत्तीवर बसवून गावातून मिरवणूक काढली. मिरवणुकीत बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते. उपजिल्हाधिकारी विकास खरात यांच्या हस्ते प्रमोद चौगुले, गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार केला.
पुढील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांची गावातून अशीच हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल अशी घोषणा उपजिल्हाधिकारी विकास खरात यांनी केली.