सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न
By अविनाश कोळी | Published: February 28, 2023 11:02 PM2023-02-28T23:02:04+5:302023-02-28T23:09:18+5:30
प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती.
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीतील प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम आले आहेत. प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. त्यातही त्यांना यश मिळाले.
प्रमोद चौगुले यांचे प्राथमिक शिक्षण सोनी (ता. मिरज) येथे झाले होते. सोनी हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते सांगलीत स्थायिक झाले आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस (जि. सांगली) येथील नवोदय विद्यालय येथे झाले होते. वालचंदमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. उच्चशिक्षित प्रमोद चौगुले यांची भारत पेट्रोलियममध्ये निवड झाली होती. चौगुले यांनी जामनगर येथे सेवा बजावली आहे.
भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना अधिकाऱ्यांच्या संपर्कातून त्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्यांनी यूपीएससीची तयारी केली. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेत त्यांनी केवळ दुसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पहिल्या प्रयत्नात त्यांची एका गुणाने संधी हुकली होती. त्याची कसर भरून काढत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०२० च्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. पोलिस उपअधीक्षक हे पद त्यांना हवे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. या दुसऱ्या प्रयत्नातही ते राज्यात प्रथम आले.
गरिबीतून शिक्षण घेत यश
चौगुले यांच्या आई-वडिलांनी सुरुवातीच्या काळात खूप कष्ट घेतले. वडिलांनी टेम्पोचालक म्हणून काम करीत तर आईने शिवणकाम करीत संसाराला हातभार लावला. अशा परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेत, नोकरी करीत प्रमोद यांनी परीक्षा दिली आणि यश मिळवले.
मेव्हणेही राज्यात प्रथम
प्रमोद चौगुले यांचे मेव्हणे प्रसाद चौगुले यांनीही त्यांच्यापूर्वी राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यांच्या पाठोपाठ प्रमोद यांनी तसेच यश मिळविले.
मागच्या वर्षी प्रथम क्रमांक आला होता, पण हवे असलेले पद मिळाले नसल्याने मी पुन्हा परीक्षा दिली. त्यासाठी अभ्यास चालूच ठेवला. अभ्यासातील सातत्यामुळेच दुसऱ्यांदाही मोठे यश मिळविता आले.
-प्रमोद चौगुले.