प्रमोद सूर्यवंशीसह आठजणांना अटक
By admin | Published: July 1, 2015 11:15 PM2015-07-01T23:15:53+5:302015-07-02T00:24:31+5:30
दोघांवर खुनीहल्ला : छेडछाडीच्या संशयावरून काठीने बेदम मारहाण
सांगली : दोघा तरुणांंना छेडछाड करीत असल्याच्या संशयावरून काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रमोद प्रकाश सूर्यवंशी (वय ३५, रा. बुरुड गल्ली, सांगली) याच्यासह आठजणांंना शहर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी येथील नदीघाटावर घडला होता. सर्वांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
सातारा येथील अर्शद राजेसाहेब बागवान (वय २४, रा. गोपाळ पेठ) व असिफ बागवान (वय २१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) गवळी गल्लीत जात असताना प्रमोद सूर्यवंशीसह आठ ते दहाजणांनी त्यांना रस्त्यात अडवले. गल्लीत आल्याचा जाब विचारून दोघांंना दुचाकीवरून वसंतदादा समाधीजवळ नेले आणि काठीने बेदम मारहाण केली.
त्यांच्या डोक्यावर, पाठीवर व छातीवर काठीने मारहाण करण्यात आली. तेथील काही नागरिकांनी कळवताच शहर पोलीस ठाण्याचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोघांची सुटका केली. त्यानंतर सूर्यवंशीसह आठजण तेथून निघून गेले. मंगळवारी रात्री प्रमोद सूर्यवंशीसह विजय बळीराम साळुंखे (वय ४४, रा. सदर बाजार, सातारा), अमोल प्रकाश वास्कर (२८), धनंजय दत्तात्रय गवळी (२३), प्रतीक समीर मालवणकर (२३), विकास पद्माकर सोनटक्के (२९), किशोर बाळू वास्कर (२३), ऋषिकेश जयवंत कांबळे (२३, सर्व रा. गवळी गल्ली, सांगली) यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल करण्यात आले.
रात्री याबाबत जखमी अर्शद बागवान याचा जबाब घेतल्यानंतर या आठजणांना बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता, तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसचा माजी नगरसेवक असलेला प्रमोद सूर्यवंशी याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)