डाळिंबाच्या बागेत गिरवले धडे, शेतीतून पाऊण कोटीचे उत्पन्न घेत प्रणवची दहावीत ४८ टक्क्यांची कमाई
By हणमंत पाटील | Published: May 30, 2024 05:52 PM2024-05-30T17:52:38+5:302024-05-30T18:21:42+5:30
लक्ष्मण सरगर आटपाडी : शाळा ही उत्तम उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी प्रयोगशाळा असल्याचे बोलले जाते. हे सिद्ध करून दाखवताना ...
लक्ष्मण सरगर
आटपाडी : शाळा ही उत्तम उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी प्रयोगशाळा असल्याचे बोलले जाते. हे सिद्ध करून दाखवताना केवळ चार भिंतींच्या शाळेत न रमता काळ्या मातीची सेवा करून शेती शाळेतही यशस्वी ठरलेल्या खांजोडवाडीच्या प्रणव शंकर सूर्यवंशी याने पुस्तकातल्या शाळेतही यश मिळवले. शेतीतून वडिलांच्या बराेबरीने पाऊणकाेटीचे उत्पन्न घेणाऱ्या प्रणवने दहावीतही ४८ टक्के गुणांची कमाई केली. ग्रामस्थांनीही अभिनंदनाचे फलक झळकावत त्याच्या जिद्दीचे काैतुक केले.
वयाच्या सोळाव्या वर्षी प्रणव वडिलांच्या बराेबरीने आपल्या दहा एकर शेतीमध्ये वर्षाकाठी पाऊणकोटीचे उत्पन्न घेत आहे. डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाणारे आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीत सूर्यवंशी कुटुंबानेही डाळिंब बाग केली आहे. दर्जेदार डाळिंब पीक घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. पिढ्यान्पिढ्या शेती हाच व्यवसाय असलेला प्रणव चार भिंतीच्या शाळेत कधी रमलाच नाही.
त्याला डाळिंबाच्या शाळेनेच भुरळ घातली होती. अगदी लहान वयापासूनच फक्त डाळिंब शेती हीच आपली शाळा असे त्याचे म्हणणे असे. चार भिंतीच्या शाळेकडे त्याचा ओढा कमीच... मात्र मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ४८ टक्के गुणांसह उत्तीर्ण होत त्याने कुटुंबासह गावालाही आश्चर्यचकित केले आहे.
कायमच डाळिंब शेतीत रममाण असलेल्या प्रणवने शालेय अभ्यासक्रमात कधी रुची दाखवलीच नाही. भारत देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. सध्या नाेकरीआधारित शिक्षणाकडे तरुणांचा कल वाढला आहे. मात्र, प्रणव शिक्षणाबरोबरच शेती हेच उत्तम साध्य समजून शेतीशीच एकनिष्ठ आहे.
आजच्या युवकांनी शिक्षणाबराेबर उत्तम शेती केल्यास अर्थार्जन तर होतेच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावल्याचे समाधान मिळते. शिक्षणासोबत शेतीलाही महत्त्व देणे गरजेचे असल्याचे प्रणवने दाखवून दिले आहे.
डाळिंबाच्या बागेत गिरवले धडे
सध्या दहावीला खासगी क्लासचे फॅड आहे. मात्र, प्रणवने क्लास काय शाळेकडेही पाठ फिरविली. डाळिंबाच्या बागेत काम करीत जमेल तेवढा अभ्यास करून ४८ टक्क्यांची कमाई केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करण्यासाठी गावात अभिनंदनाचे फलक लावले आहेत.