Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:55 PM2024-08-03T17:55:48+5:302024-08-03T17:59:59+5:30

संजय पाटील, अजितराव घोरपडेंच्या भूमिकेची उत्सुकता

Pratap Patil's candidature from Nationalist Congress Party for Tasgaon-Kavathemahankal Legislative Assembly is likely to be finalized | Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील?

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील?

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी अंतिम आहे. तर महायुतीकडून जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील यांची उमेदवारी अंतिम होण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेची ही मतदारसंघात उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसल्यानंतर, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली. मागील निवडणुकीत विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र पाच वर्षात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेषता लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांचा पराभवाने तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ येथे झालेल्या कार्यक्रमात दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत. मात्र रोहित पाटील यांच्या विरोधात कोण? हे चित्र अद्याप निश्चित नाही. महायुतीच्या जागा वाटपातील सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाकडे तो मतदारसंघ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहील, अशी शक्यता आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप पाटील यांचे उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीमुळे या चर्चेला आणखीनच वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रसद दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला घोरपडेंची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. तर लोकसभेच्या पराभवानंतर माजी खासदार संजय पाटील स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की पुत्र प्रभाकर पाटील यांना रिंगणात उतरवणार? याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अजितराव घोरपडे यांची उपस्थिती लक्षवेधी..

शिरगाव येथे डॉ. प्रताप पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री घोरपडे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गटाचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीत घोरपडेंची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे. त्यांनी विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या डॉ. पाटील यांच्या वाढदिवसाला हजेरी लावल्यामुळे उमेदवारीची पारडे जड मानले जात आहे.

Web Title: Pratap Patil's candidature from Nationalist Congress Party for Tasgaon-Kavathemahankal Legislative Assembly is likely to be finalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.