प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी !
By Admin | Published: March 11, 2017 09:56 PM2017-03-11T21:56:35+5:302017-03-11T22:00:59+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर (सातारा), दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यावर आजही साजरे केले जाणारे सण, उत्सव शिवरायांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच साजरे केले जातात. शिवरायांचे वृक्षप्रेम हे सर्वश्रूत आहे. म्हणूनच किल्ल्यावर गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली. विशेष म्हणजे, गेल्या ३५८ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, शिवरायांच्या हुकूमाचे आजही काटेकोरपणे पालन केले जात आहे.
प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. शिवरायांच्या अनेक आठवणी या किल्ल्याशी जोडल्या गेल्या आहेत. किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या स्थापना कालापासून शिवरायांनी या ठिकाणी विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच सर्व सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जात आहेत.
होळी हा त्यापैकी एक सण. शिवराय हे वृक्षप्रेमी होते. वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांनी वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आणि रयतेलाही याचे महत्त्व विशद करून दिले. होळीच्या दिवशीही फळे, फुले देणाऱ्या वृक्षांची कत्तल न करता केवळ गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा शिवरायांनी भवानीमातेच्या स्थापनेपासून सुरू केली. या घटनेला ३५८ वर्षे झाली असली तरी आजही शिवरायांच्या हुकूमाचे काटेकोर पालन करून किल्ल्यावर होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे.
असा होतो सण साजरा ...
श्री भवानीमातेची होळी ही ऐतिहासिक होळी म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसरातील होळीचा माळ याठिकाणी होळी पेटविली जाते. किल्लेदार विजय हवालदार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळीची विधिवत पूजा केली जाते. यानंतर हडप गुरुजी यांचा हस्ते होळी पेटवली जाते. ही होळी पेटविल्याशिवाय पंचक्रोशीतील होळ्या पेटविल्या जात नाहीत.
अडीअडचणींवर एकीतून मात
श्री भवानीमातेच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. दुसरा दिवस हा धुळवडीचा असतो त्या दिवशी सर्व ग्रामस्थ केदारेश्वर मंदिरात जमतात. याठिकाणी गावातील अडीअडचणींवर चर्चा केली जाते. तसेच त्या अडचणी सोडविण्यासाठी विचारविनिमय केला जातो. या परंपरेमुळे गावात एकी कायम राहत असून, विचार विनिमय झाल्याशिवाय किल्ल्यावर दैनंदिन व्यवहार सुरू होत नाहीत.