प्रतीक पाटील यांच्या लोकसभेच्या हालचाली थंडावल्या; हातकणंगले उमेदवारीवर मौन अन् प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 01:49 PM2023-12-23T13:49:43+5:302023-12-23T13:51:53+5:30
अशोक पाटील इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीतून सुरू असलेली राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या ...
अशोक पाटील
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीतून सुरू असलेली राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या थंडावली आहे. यावर पाटील यांनीही कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. उलट ‘नो कॉमेंट्स’ म्हणून दुसऱ्या विषयाला हात घातला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आजही प्रश्नचिन्ह आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारी २०२४ मध्ये वाजण्याचे संकेत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी धडक देत स्थापन झाल्यापासून प्रथमच राजारामबापू कारखाना एक दिवसासाठी बंद पाडला. यावरही अध्यक्ष या नात्याने प्रतीक पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
काही कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडल्याचा राजू शेट्टी यांचा दावा आहे. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी चालवली आहे. ऊस उत्पादकांची मोळी बांधून हातकणंगलेतून रणशिंग फुंकले आहे परंतु भाजप आणि इंडिया आघाडी शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष्य ठेवून असल्याने प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा विरळ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
इंडिया आघाडीतून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीच प्रतीक पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता. त्याचवेळी हातकणंगलेतील ६ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून गोपनियरित्या चाचपणी करण्यात आली होती. यामध्ये प्रतीक पाटील नंबर १ ला असल्याचे दिसून आले. परंतू अचानकपणे पाटील यांच्या नावाची राजकीय हवा थंडावली आहे.
राज्य पातळीवरील घडामोडी पाहता हिवाळी अधिवेशनात विरोधकांची खिंड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी लढविली. त्यांच्या अनुपस्थित इस्लामपूर-शिराळा मतदार संघात प्रतीक पाटील यांनी पक्षबांधणीसाठी काही नवीन निवडीची चाचपणी केली परंतु निर्णय मात्र गुलदस्त्यात ठेवले.
इस्लामपूर शहर महिला अध्यक्षपद आणि युवा शहराध्यक्ष पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्याचा निर्णयही प्रतीक पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या कोर्टात ढकलल्याची चर्चा आहे. एकंदरीत सध्यातरी प्रतीक पाटील यांच्या राजकीय हालचाली थंडावल्याचे चित्र आहे.
‘नाे कॉमेंट्स’
आगामी काळात जयंत पाटील आणि आपण भाजपमध्ये जाणार का? आणि लोकसभा लढवणार का? या प्रश्नांवरही प्रतीक पाटील यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणून राजकीय सोडून इतर विषयाला हात घातला.